घाईघाईने निर्बंध उठवून धोका पत्करू नका; सात जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 07:05 AM2021-06-25T07:05:57+5:302021-06-25T07:06:11+5:30
रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील अशा इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, असेही निर्देश त्यांनी दिले.
मुंबई : दुसरी लाट गेलेली नाही, तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लस विषाणूचाही धोका आहे. निर्बंधांबाबत लेव्हल ठरविल्या असल्या तरी निर्बंध उठविण्याबाबत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका व धोका पत्करू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनांना गुरुवारी बजावले.
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवावा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील, हे पहा. रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील अशा इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, असेही निर्देश त्यांनी दिले.
ऑक्सिजन निर्मिती वाढवण्याचे आदेश
ऑक्सिजन निर्माता कंपन्यांनी तीन-चार आठवड्यात ऑक्सिजनची निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवावी, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील मोठया ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींना एका बैठकीत दिले. सध्या १३०० मे.टन निर्मिती होत असून ती तीन हजार मे.टनावर न्यायची आहे, असे ते म्हणाले.