Join us  

आम्हाला व्होटिंगला पाठवत नाहीत !

By admin | Published: February 23, 2017 7:04 AM

‘हॅलो, आम्हालाही मतदान करायचेय, पण आमचा मालक आम्हाला पाठवत नाही,’ अशा आशयाच्या

गौरी टेंबकर-कलगुटकर / मुंबई‘हॅलो, आम्हालाही मतदान करायचेय, पण आमचा मालक आम्हाला पाठवत नाही,’ अशा आशयाच्या फोन कॉल्सनी कामगार आयुक्त कार्यालयाची ‘हेल्पलाइन’ मंगळवारी दिवसभर खणाणत होती. दिवसभरात ६४ तक्रारींची नोंद या ठिकाणी करण्यात आली. त्या सगळ्या तक्रारी त्वरित अटेंडही करण्यात आल्या.मतदानाला जाण्यास परवानगी दिली नाही तर विशिष्ट क्रमांकावर फोन करा, असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गेल्या तीन-चार दिवसांपासून फिरत होता. मतदानासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने ही मोहीम मंगळवारी राबवली. या मोहिमेचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले. महानगरपालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीच्या तुलनेत २०१७ मध्ये मतदानाचा टक्का वाढला. मतदानासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यातच कामगार आयुक्त कार्यालयाने यावर करडी नजर ठेवली होती. कार्यालयाचे लॅण्डलाइन क्रमांक सर्वत्र व्हायरल करण्यात आले.मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच या क्रमांकावर तक्रारी येण्यास सुरुवात झाली. याबाबत राज्य सरकारकडून एक नोटीस जारी करण्यात आली होती. ज्यात मतदारांना मतदानासाठी भरपगारी रजा देण्यात यावी, तसेच अत्यावश्यक सेवेत असल्यास किमान दोन तासांची सूट मतदान करण्यासाठी दिली जावी, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार यासाठी काही ‘विशेष पथके’ नेमण्यात आली होती. नियंत्रण कक्षावर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची माहिती बोर्डवाइज संबंधित अधिकाऱ्याला दिली जात होती. त्यानुसार त्या-त्या पत्त्यावर जाऊन आमच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारींची शहानिशा केली गेल्याची माहिती या विभागाच्या उपायुक्त एस.एस. लोखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ५८ तक्रारी आम्हाला नियंत्रण कक्षावर मिळाल्या. जो आकडा शेवटी ६४वर जाऊन थांबला. आम्ही या सर्व तक्रारी तातडीने सोडवल्याचे लोखंडे यांनी सांगितले. मतदानाचा दिवस असल्याने शहरात जवळपास ५० ते ६० टक्के कंपन्या आणि आस्थापने बंदच ठेवण्यात आली होती, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या वर्षी जशा प्रकारे कारवाई केली गेली, तशीच कारवाई पुढील निवडणुकांमध्येदेखील करण्यात येईल, जेणेकरून कोणाचाही मतदानाचा हक्क हिरावला जाणार नाही, असे लोखंडे यांनी नमूद केले.एक तक्रार अशीही...‘मी मतदान केले, मात्र मला माझ्या बाबांनादेखील मतदानासाठी न्यायचेय, त्यासाठी मला मुभा देण्यात येत नाही,’ अशी तक्रार एका मुलीने हेल्पलाइन क्रमांकावर केली. त्यावर नेमके काय उत्तर द्यावे हेच संबंधितांना सुचत नव्हते.खोट्या तक्रारीही दाखल !दाखल झालेल्या तक्रारींची शहानिशा करताना अनेक तक्रारी खोट्या असल्याचेदेखील आढळून आले. ज्यात एक खासगी कंपनी आज चालू ठेवण्यात आल्याची तक्रार होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. काही निनावी कॉल होते, जे हॉटेलमध्ये अथवा फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांबाबत केले गेले. मात्र प्रत्यक्षात तिथे कोणी मतदारच नसल्याचे उघड झाले. सुट्टी मिळविण्यासाठी तो खोडसाळपणा केला गेला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.