Join us

जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको; आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 6:09 AM

पालिकेच्या रस्ते व स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई : राज्य सरकारमध्ये अनेकांना परदेश दौरा करायला आवडते. परदेश दौरे म्हणजे सुट्टी समजायला लागेल आहेत. तुम्हाला कुठे जायचे तिथे जा; पण जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह, विधानसभा अध्यक्ष व अन्य मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली. पालिकेच्या रस्ते व स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत आदित्य म्हणाले, अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केलेला नाही. मुख्यमंत्री जर्मनीला जाऊन हायवे पाहणार होते. त्यांच्याकडे इतकी वर्षे एमएमआरडीएचे खाते आहे. मग आता तिथे जाऊन काय हायवे बघायचे? असा सवाल त्यांनी केला.

विधानसभेचे अध्यक्ष घानाला जाणार होते. इथे लोकशाहीची हत्या करताहेत आणि ते तिथे लोकशाहीवर जाऊन बोलणार होते. देशात तुम्ही लोकशाही मारत आहात तिथे जाऊन लोकांसमोर देशाची बदनामी करू नका, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा परदेश दौरा नेमका कशासाठी आहे हे त्यांनी सांगावे, असेही आदित्य म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरही आदित्य यांनी टीका केली.

शेलारांचे उत्तर...

वडील आजारी असताना सरकारी पैशांवर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते, अशी टीका भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी केली.

टॅग्स :आदित्य ठाकरेभाजपा