शहिदांना सहानुभूती नको, अधिकार द्या!

By admin | Published: May 21, 2015 02:31 AM2015-05-21T02:31:12+5:302015-05-21T02:31:12+5:30

आग विझवताना शहीद होणाऱ्या अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वाप्रमाणे कोणतीही मदत सहानूभूती म्हणून देऊ नये,

Do not sympathize with the martyrs! | शहिदांना सहानुभूती नको, अधिकार द्या!

शहिदांना सहानुभूती नको, अधिकार द्या!

Next

मुंबई : आग विझवताना शहीद होणाऱ्या अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वाप्रमाणे कोणतीही मदत सहानूभूती म्हणून देऊ नये, तर मुंबई महानगरपालिकेने कायदेशीर तरतूद करून शहिदांप्रमाणे अधिकार देण्याची मागणी मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनने केली आहे.
युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने म्हणाले की, काळबादेवी घटनेत तीन अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर काही राजकीय पक्षांनी या अधिकाऱ्यांना हुतात्मा दर्जा देण्याची मागणी केली. जीवावर उदार होऊन नागरिकांच्या प्राणाची आणि मालमत्तेची सुरक्षा करणाऱ्या अग्निशमन कर्मचारी व अधिकाऱ्यांना अग्निशमन करताना मृत्यू आल्यास अशी मागणी करण्याची गरज पडता कामा नये. मुंबई महानगरपालिकेने नियमात तशी तरतूद करायला हवी. कर्तव्य बजावताना एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पालिका प्रशासनाने घेण्याची मागणीही बने यांनी केली आहे. ते म्हणाले की, मृत कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या उरलेल्या नोकरीतील वेतन आणि इतर भत्त्यांची रक्कम एकहाती त्याच्या कुटुंबाला द्यावी. शिवाय त्याच्या पाल्याचा शैक्षणिक खर्च पालिकेने करावा. दरम्यान, कुटुंबाला वास्तव्यासाठी एका कायमस्वरूपी घराचीही व्यवस्था पालिकेनेच करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई अग्निशमन दलामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचे संघटनेने सांगितले. आस्थापना विभागात २ हजार ८३९ कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र सध्या ३४६ पदे रिक्त आहेत. वाहने आणि अग्निशमन साधनांची देखभाल करणाऱ्या कार्यशाळेत ८५ पैकी ४८ पदे रिक्त असल्याचे संघटनेने सांगितले. दलाच्या कार्यालयीन कामकाजासाठी ११८ कर्मचाऱ्यांची गरज असताना ३७ पदे रिक्त ठेवण्यात आली आहे. तर चतुर्थ श्रेणीतील २७८ पैकी १९५ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव संघटनेने उघडकीस आणले आहे.
उंच इमारतींवर लागलेल्या आगी आटोक्यात आणण्यासाठी अंधेरी, भायखळा, चेंबूर आणि विक्रोळी या चार अग्निशमन केंद्रावर अत्याधुनिक अशा बीए आणि टीटीएल व्हॅन आहेत. मात्र त्यासाठी मनुष्यबळ अद्याप भरती केलेले नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी प्रशासनाने आवश्यक मनुष्यबळही भरती करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत विविध ठिकाणी वेगवेगळ््या केमिकल्सचा वापर होत आहे. अशा ठिकाणी लागलेल्या आगीत निरनिराळे वायूही तयार होतात. मात्र त्यांचा सामना कसा करायचा, कोणती खबरदारी घ्यायची, याबाबत पालिकेने कर्मचारी व अधिकाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

चौकशी पूर्ण करा ! : गेल्या कित्येक वर्षांत मुंबईत लागलेल्या आगींची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. ती तत्काळ पूर्ण करून त्याचे अहवाल प्रसिद्ध करा. झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळता येईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Web Title: Do not sympathize with the martyrs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.