निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका
By जयंत होवाळ | Published: June 13, 2024 09:14 PM2024-06-13T21:14:24+5:302024-06-13T21:15:05+5:30
मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांची ...
मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांची तेथील कामे अजून संपलेली नाहीत. त्यामुळे अजूनही पालिकेच्या सेवेत रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
पालिकेचे जवळपास १० हजार कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात सहभागी झाले होते. जवळपास दोन महिने हे अधिकारी निवडणुकीचे काम करत आहेत. २० जून रोजी मतदान संपल्यानंतर मतदानाशी संबंधित कर्मचाऱ्यांना या कामातून मुक्त करण्यात आले, तर ४ जून रोजी मतमोजणी संपल्यानंतर मोजणीच्या कामाशी संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी पुन्हा पालिकेच्या सेवेत तात्काळ रुजू होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कर्मचारी अजून आपल्या मूळ जागी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे. कार्यमुक्त केल्यानंतरही जे कर्मचारी पालिकेत आलेले नाहीत त्यांचे वेतन रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यास युनियनने आक्षेप घेतला आहे;.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,क्षेत्रिय अधिकारी तसेच इतर कामकाजासाठी या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुक २०२४ चे कामकाज पार पडले असले तरी येऊ घातलेल्या विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणुकांची पूर्वतयारी तसेच इतर कामकाज अद्यापही चालु असल्याचे समजते. त्यामुळेच काही पालिका कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे.
कार्यमुक्त केले नसल्याने बरेचसे कर्मचारी अद्याप पालिका कार्यालयात रुजू झालेले नाहीत, असे पालिकेनेच परिपत्रकात म्हटले आहे. असे असताना सदर कर्मचारी पालिका सेवेत रुजू न झाल्यास त्यांचे वेतन रोखण्यात येईल असे संबधित कर्मचाऱ्यांना आपण कसे काय कळवु शकता , असा सवाल युनियनने केला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये , अशी विनंतीही केली आहे.