मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी देशभरात सुरू केलेल्या आंदोलनात आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनीही अनेक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आयआयटी मुंबई ही संस्था अशा कुठल्याही कायद्याचे समर्थन अथवा विरोध करीत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट करूनही आयआयटीमधील विद्यार्थ्यांची आंदोलने आणि निषेध थांबले नाहीत. या पार्श्वभूमीवर अखेर आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांसाठी संस्था प्रशासनाने नवे नियम जारी केले आहेत. याद्वारे राष्ट्रविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका, असा इशारा आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना दिला आहे.
आयआयटी मुंबईच्या स्टुडंट्स अफेयर्सचे असोसिएट्स डीन प्राध्यापक जॉर्ज मॅथ्यू यांनी ही १५ बाबींची नियमावली जारी केली. हॉस्टेलमध्ये भाषण करणे, गाणी म्हणणे तसेच शांतता भंग करणे कारवाईस पात्र ठरेल. तसेच हॉस्टेलमध्ये कोणतेही पॅम्पेलट अथवा माहिती पुस्तिकेचे वाटप करणे चुकीचे आहे. हॉस्टेलमध्ये रात्री १० वाजल्यानंतर कोणीही बाहेरची व्यक्ती राहू शकणार नाही, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची आंदोलने पाहून त्यांनी त्यांचे राजकीय विचार कॅम्पसच्या बाहेर व्यक्त करावेत, असे आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या एका गटाने आयआयटीच्या संचालकांना पत्र लिहिले होते. आयआयटी परिसराला राजकारणापासून दूर करण्याच्या संस्थेच्या निर्णयावर या पत्रातून टीका करण्यात आली होती. त्यामुळे आता आयआयटी प्रशासनाकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यासाठीच ही नियमावली करण्यात आल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात भाग घेतल्यामुळेच जाणूनबुजून विद्यार्थ्यांवर राग काढण्यात येत आहे, असे या नियमावलीबाबत बोलताना एका विद्यार्थ्याने सांगितले.
जेएनयू स्कॉलर शर्जील इमामचेही या आयआयटीमधील काही विद्यार्थ्यांनी समर्थन केले होते. शर्जीलला मंगळवारी देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन नियमावली जारी झाली असली तरी सध्या सुरू केलेली आंदोलने कायम सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे, असे मतही काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.