लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : म्हाडाकडून २ हजार ३० घरांची लॉटरी काढण्यात आल्यानंतर आता विजेत्या अर्जदारांना घरांचा ताबा देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याची सुरुवात प्रोव्हिजनल ऑफर लेटर पाठविण्यापासून होणार आहे. मात्र, तोपर्यंत घर मिळविण्यासाठी दलालांची मदत घेऊ नये, असे आवाहन 'म्हाडा'ने केले आहे.
घर मिळण्यास विलंब झाला किंवा काही अडचणी आल्यानंतर त्रयस्थ व्यक्तीची मदत घेण्याचे प्रकार घडतात आणि यात अर्जदाराची फसवणूक होते. पहिल्यांदा विजेत्या अर्जदारांना प्रोव्हिजनल ऑफर लेटर पाठविले जाईल. ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे; त्यातील घरांच्या प्रक्रियेला काहीसा विलंब होईल. ज्या इमारती तयार आहेत किंवा ओसी मिळालेल्या इमारतींचे लेटर पाठविले जाईल.
सुरुवातीला २५ टक्के आणि नंतर ७५ टक्के घराची रक्कम भरण्यासंबंधीची माहिती लेटरमध्ये दिली जाईल. त्यासाठीचा कालावधी नमूद असेल. घराची संपूर्ण रक्कम भरताना विजेत्या अर्जदाराला कर्ज घ्यायचे असेल तर म्हाडाकडून यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. ही प्रक्रियाही ऑनलाइन असते. घराची १०० टक्के रक्कम भरल्यानंतर ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होते. तत्पूर्वी ताबा प्रमाणपत्र देताना स्टॅम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन होते. कार्यकारी अभियंत्याकडून घराचा ताबा दिला जातो.
अर्जदार विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाईल. त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटशी साधर्म्य असणारे बनावट अनधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली होती. या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे म्हाडा प्रशासनातर्फे बनावट वेबसाईट निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर सेलकडे १३ ऑगस्टला तक्रार दाखल केली होती.
सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतात. अशा प्रकारे संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही. याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी.
मुंबई मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणत्याही समाजमाध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची अथवा इतर मध्यस्थांची मदत घेण्यात आलेली नाही. कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट, मध्यस्थ, दलाल म्हणून नेमलेले नाही. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये आणि तसे केल्यास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही.