मुंबई - पुलवामा हल्ल्याबाबत माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केलेल्या विधानबद्दल आपल्या फेसबुक पोस्टवरुन खुलासा केला आहे. तसेच भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार मारले याबाबच चर्चा व्हायला नको, असेही पवार यांनी म्हटले आहगे. पुलमावा हल्ल्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त करण्याचा सल्ला मीच मोदी सरकारला दिला होता, असे पवार यांनी म्हटल्याचे वृत्त होते.
पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठिशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला.
परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती.
भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. 1965 आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे.
शरद पवारांनी वरील मजकूर आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर, देशात पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप उसळल्याचे दिसून आले.