"आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही..."; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:40 PM2022-08-19T15:40:04+5:302022-08-19T15:40:36+5:30
आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं असं सांगत शेलारांनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले.
मुंबई - हिंदु सणांसोबत भाजपा आणि हिंदु सणांना विसरणारी शिवसेना हे जनतेला माहिती पडले आहे. वरळीतील आमदार भाजपाच्या मतांवर निवडून आलेत त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. मुंबईकरांचं स्वप्न हे भाजपाचं स्वप्न असल्याने त्यासाठी काम होत आहे. संपूर्ण मुंबईत भाजपाचं कमळ फुलणार आहे असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी व्यक्त करत आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.
आशिष शेलार म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले. शिवसेनेने मराठी माणसांचे सण कधीच मागे टाकले. शिवसेना गणपती, नवरात्री, दहिकाला, श्रावण यातील सहभागीता सोडली. त्यामुळे वरळीत जांबोरी मैदानात दहिहंडी उभारण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. साधा अर्जही केला नाही. शिवसेना विसरली आहे परंतु जनता हे विसरणार नाही. भाजपा जनतेसोबत आहे असं त्यांनी सांगितलं.
तसेच आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं आणि तरुणाईचा उत्साह, हिंदु सणाचा उत्साह पुन्हा पाहायला मिळतोय. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असंही शेलारांनी म्हटलं.
मला पोरकट राजकारणात पडायचं नाही - आदित्य
आज आनंदाचा दिवस आहे. साजरा करा. उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका. जांबोरी मैदानात आम्ही परवानगीच मागितली नव्हती. २ वर्षापूर्वी अडीच कोटी फंड देऊन सुशोभीकरण केले होते. उगाच राजकारण आणू नका. निवडणुका येतील तेव्हा येतील. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून बालिशपणा करू नका असा टोला वरळीचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाला लगावला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सगळीकडे उत्साह चांगला आहे. लहानपणापासून आम्ही हंडी बघतोय. आज सुरक्षित गोविंदा साजरा होतोय हे चांगले आहे. गेली २ वर्ष कोविड काळात गेले. यंदा लोक उत्साहात बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी मी जातोय. दहिहंडी सगळीकडे साजरी होते. आजच्या दिवशी मला पोरकट राजकारणात जायचं नाही. आनंदाचा क्षण साजरा करायला. सगळ्यांना हा क्षण साजरा करू द्या असं त्यांनी सांगितले.