Join us

खुले में शौच ना करे...मग आम्ही जायचे कोठे ?

By admin | Published: April 30, 2017 4:34 AM

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत ‘खुले में शौच ना करे’ असा संदेश सरकारमार्फत प्रत्येक नागरिकाला दिला जात आहे. मात्र, कांदिवलीत शेकडो लोक वापरत असलेले

- गौरी टेंबकर-कलगुटकर,  मुंबई

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत ‘खुले में शौच ना करे’ असा संदेश सरकारमार्फत प्रत्येक नागरिकाला दिला जात आहे. मात्र, कांदिवलीत शेकडो लोक वापरत असलेले स्वच्छतागृह गेल्या वर्षभरापासून वाईट स्थितीत आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाअभावी आम्ही जायचे कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.कांदिवली पश्चिमच्या आर/दक्षिण विभागात जय शिवशक्ती सेवा सोसायटीमध्ये चौदा सीटर स्वच्छतागृह आहे. यातील निम्म्या शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. तुटलेले दरवाजे, उडालेले छप्पर, उखडलेल्या लाद्या आणि त्याहूनही जर्जर झालेला कोबा, ज्यातून कधीही कोणीही कोसळून मलाच्या टाकीत पडून जीव गमावू शकतो. कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरात असलेल्या या स्वच्छतागृहाचा वापर सुमारे साडे तीनशे लोक करतात. मात्र, अर्ध्याअधिक शौचालयांची दयनीय परिस्थिती असल्याने, त्याचा वापर केला जात नाही. महत्त्वाचे म्हणजे, महिलांची फारच गैरसोय होते. शौचालयाबाहेर कचऱ्याचा मोठा ढीग साफ केला जात नाही. गेल्या वर्षभरापासून स्थानिक याची तक्रार पालिका आणि नगरसेवकांकडे करत आहेत. निवडणुकीदरम्यान दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आणि आचारसंहितेचे कारण देत, अखेर ते काम अद्याप रखडले आहे, असे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. नवनिर्वाचित नगरसेवक कमलेश यादव यांच्याकडे स्थानिकांनी आता धाव घेतली आहे. यावर आर/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांची भेट घेत, चर्चा करण्यात आली असून, लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.आम्ही चर्चा केली आहे. आता बैठकीनंतर तांत्रिक मंजुरी मिळवत, आम्ही शौचालयाचे काम सुरू करणार आहोत, तसेच या परिसरातील लोकसंख्या मोठी असल्याने, ज्यांना घरी शक्य असेल, त्यांना स्वच्छतागृह घरी बांधून देत, ती निम्म्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.- कमलेश यादव, स्थानिक नगरसेवक१० मेपासून स्वच्छतागृहाची दुरुस्ती सुरू केली जाईल. काही कागदोपत्री अडचणी, तसेच निधीअभावी ते काम रखडले होते. मात्र, दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करून स्थानिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.- साहेबराव गायकवाड, सहायक आयुक्त, आर/दक्षिण विभाग