Join us

लोकलमध्ये उभ्याने प्रवास नको रे बाबा!

By admin | Published: December 26, 2015 1:54 AM

गर्दीतला प्रवास सुकर व्हावा आणि लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने आसन व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आसन व्यवस्थेतील बदल

मुंबई : गर्दीतला प्रवास सुकर व्हावा आणि लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने आसन व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आसन व्यवस्थेतील बदल असलेली पहिली लोकल ख्रिसमसच्या मुहूर्तावर धावली. मात्र या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उभ्याने प्रवास करताना बराच त्रास सहन करावा लागला. तासन्तास उभ्याने होणाऱ्या प्रवासामुळे हा प्रवास नको रे बाबा, अशीच काहीशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. मध्य रेल्वेने आसन व्यवस्थेत बदल करणारी नवी लोकल शुक्रवारी चालविण्यात आली. ही लोकल दुपारी १२.0१च्या सुमारास बदलापूरहून सीएसटीसाठी धीमी लोकल म्हणून धावली. या लोकलच्या पाच डब्यांतील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यातील चौथा डबा हा मेट्रोच्या आसनव्यवस्थेप्रमाणे करण्यात आला असून, ५, ६, ९ आणि १0व्या डब्यातील दरवाज्याकडील प्रत्येकी एक आसन काढून टाकण्यात आले आहे. या नव्या आसन व्यवस्थेमुळे जादा ११२ प्रवासी प्रवास करू शकतील, असा दावा केला होता. मात्र जादा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असली तरी बऱ्याच प्रवाशांना प्रवास हा उभ्यानेच करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया शुक्रवारी प्रवाशांनी दिली. प्रवास करताना फक्त २४ प्रवाशांनाच बसण्यासाठी जागा मिळत असल्याने आणि अन्य प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बदलापूर किंवा अन्य स्थानकांतून सीएसटीसाठी लोकल सोडल्यास तसेच सीएसटीहूनही ही लोकल सोडल्यास कमी अंतराच्या मार्गासाठी ती चालवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांच्या प्रतिक्रियाया नव्या आसनांमुळे प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, रेल्वेत अशी व्यवस्था योग्य नाही. - विजय पवार बदलापूरहून कुटुंबासह प्रवास करताना बराच त्रास सहन करावा लागला आहे. तासाभरानंतर बसण्यासाठी जागा मिळाली. सामानासहित प्रवास करताना ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र हा प्रवास परवडणारा नाही. - अरुण म्हात्रे