मुंबई - मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेसोबतच आहेत, असा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. शिवसेनेनं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहिर केलं आहे.
पक्ष सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा मनसेने केला आहे. या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, तसंच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असंही मनसेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रकरणातील हवाच काढून टाकली.
मनसेतून शिवसेनेत गेलेले लांढे यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं असून त्यावर सहाही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये आम्ही खाली सह्या करणारे सहाही नगरसेवक शिवसनेनत आहोत. आणि शिवसेनेतच राहणार. अफवावर विश्वास ठेवू नका असे जाहीर करण्यात आलं आहे. आमची बदणामी करण्याचे षडयंत्र कोणीतरी करत असल्याचा आरोपही या सहा नगरसेवकांनी केला आहे.
13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. मिळालेल्या वृत्तानुसार, अश्विनी मतेकर (वॉर्ड 156) आणि दिलीप लांडे (वॉर्ड 163) यांच्याशिवाय अन्य चार नगरसेवकांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पक्ष सोडून शिवसेनेत गेलेल्या चार नगरसेवकांच्या घरवारसीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र ते पुन्हा पक्षात परतल्यास आनंदच आहे. अशी प्रतिक्रिया लोकमतला मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली आहे. परमेश्वर कदम, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव यांनी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या नगरसेवकांनी दोन तासांनी निर्णय कळवणार असल्याचं सांगितलं आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू. असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं होतं.
सत्तेसाठी रस्सीखेच : शिवसेनेकडे ८४ अधिक तीन अपक्ष व आता मनसेचे सहा असे ९४ नगरसेवक आहेत. भाजपाकडे ८२ अधिक दोन अपक्ष असे ८४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होईल. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचे संख्याबळ ८५ होईल. काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडल्यास भाजपाकडे ९५ म्हणजे शिवसेनेपेक्षा एक नगरसेवक अधिक असेल.