नियम तोडण्याची सवय लावू नका - पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:24 AM2019-02-05T04:24:01+5:302019-02-05T04:24:32+5:30
९० टक्के वाहनचालक उच्चशिक्षित असतानाही, त्यांच्याकडून वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार घडत असतात.
नवी मुंबई : ९० टक्के वाहनचालक उच्चशिक्षित असतानाही, त्यांच्याकडून वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार घडत असतात. बेजबाबदारपणे वाहने चालवून त्यांच्याकडून स्वत:सह इतरांच्या जीवाशी खेळ होत आहे. त्यामुळे स्वत:ला नियम तोडण्याची सवय लावू नका असा सल्ला पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी शहरवासीयांना दिला आहे.
वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने नवी मुंबई वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या शुभारंभाच्या निमित्ताने वाशीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नागरिकांनी स्वत:ला नियम तोडण्याची सवय लावू नका असा मोलाचा सल्ला दिल्ला. रस्ते अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे काळाची गरज बनली आहे. परंतु ९० टक्के वाहनचालक उच्चशिक्षित असतानाही, त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे स्वत:ला नियम तोडण्याची सवय लावून घेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच केवळ पैशाची श्रीमंती हाच मोठेपणा समजू नये अशा शब्दात कानउपटणी देखील केली. हेल्मेट सक्तीमागे पोलिसांचा स्वार्थ नसून नागरिकांचेच हित जोपासत असल्याचेही सांगितले.
पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक तरुण मृत पावत असल्याचे गांभीर्य शासनाला असल्याचे सांगितले. मात्र अपघात रोखण्यासाठी सर्वकाही शासन करू शकत नसल्याने नागरिकांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. त्याच उद्देशाने सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताहातून जनजागृती केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित सिने अभिनेत्री मृणाल दुसानीस व शशांक केतकर यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन केले. कार्यक्रमास सहायक पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला,वाहतूक शाखेचे उपआयुक्त सुनील लोखंडे, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, अशोक दुधे, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वाहतूक पोलिसांना प्रथमोपचार पेटी देण्यात आली. तर नुकत्या अमलात आलेल्या एक राज्य एक चलान अंतर्गत कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना ई चलान मशिनचे वाटप करण्यात आले.
हत्यांपेक्षा अपघाती मृत्यूचे प्रमाण गंभीर
नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात पाच वर्षात १६५६ जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत, तर याच कालावधीत हत्येच्या २७० घटना घडल्या आहेत. दोन्ही प्रकारात नागरिकांचे जीव गेले आहेत. तर नागरिकांकडून हत्येच्या गुन्ह्यात पटकन संवेदनशीलता दाखवली जाते. मात्र अपघात स्वत:च्या चुकांमुळे घडत असल्याने त्याचा तितका ऊहापोह होत नसल्याची खंत संजय कुमार यांनी व्यक्त केली.