रेसलिंग स्टंट्सचा प्रयत्न करू नका
By admin | Published: May 30, 2017 06:42 AM2017-05-30T06:42:33+5:302017-05-30T06:42:33+5:30
रेसलिंगच्या अनेक फाइट्स पाहून लहान मुले आपल्या घरी या खेळातील स्टंट्स करण्याचा प्रयत्न करतात. या सर्व मुलांना एकच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेसलिंगच्या अनेक फाइट्स पाहून लहान मुले आपल्या घरी या खेळातील स्टंट्स करण्याचा प्रयत्न करतात. या सर्व मुलांना एकच विनंती आहे की, कृपया असा प्रयत्न करू नका. हे सर्व स्टंट्स करण्यासाठी खेळाडूंना विशेष प्रशिक्षण मिळालेले असते. त्यामुळे उत्साहाच्या भरात केलेल्या या स्टंट्समुळे तुम्हाला गंभीर दुखापतही होऊ शकते. तेव्हा कृपया हे टाळा, अशा शब्दांत इम्पॅक्ट रेसलिंगचा एकमेव भारतीय रेसलर महाबली शेरा याने लहानग्यांना सावध केले.
डब्ल्यूडब्ल्यूई नंतर जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेला ‘इम्पॅक्ट रेसलिंग’च्या फाइट्स मुंबईत ३० व ३१ मे रोजी रंगणार आहेत. यानिमित्ताने शेरा याने ‘लोकमत’शी संवाद साधला. या वेळी त्याने चिमुकल्या चाहत्यांना सावध केले. ‘या खेळातील फाइट्स रोमांचक असतात. यातील स्टंट्ससाठी प्रत्येक रेसलरला विशेष प्रशिक्षण दिले जाते. आज लहान मुले अनेकदा घरी या फाइट्सची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे स्टंट्स करताना जर का कोणती दुखापत झाली, तर ती खूप महागात पडू शकते. हे स्टंट्स करण्याचे लहान मुलांनी टाळावे,’ असेही शेरा म्हणाला.
भारतात पहिल्यांदाच इम्पॅक्ट रेसलिंग होत असल्याबाबत शेराने सांगितले, ‘मी खूप उत्साहित आहे. या खेळात एकमेव भारतीय असल्याने घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यास मी खूप उत्सुक आहे. भारतात या खेळाचा अधिक प्रसार होईल.’
तसेच, ‘इम्पॅक्ट रेसलिंगमध्ये मी भारताची ओळख झालोय याचा खूप अभिमान आहे. माझ्या लढती पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. माझ्यावर देशवासीयांच्या अनेक अपेक्षा असतात. इम्पॅक्ट रेसलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतोय हीच अभिमानाची बाब आहे, असेही शेराने या वेळी म्हटले.
आज अनेक युवा या खेळामध्ये येण्यास उत्सुक आहेत. या खेळात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी असावी. आवडत्या रेसलिंग स्टारप्रमाणे आपणही यात यशस्वी होऊ असा समज चुकीचा आहे. हा खेळ जितका सोपा वाटतो, तसा अजिबात नाही. येथे खूप दुखापती होतात आणि संयम बाळगणे सर्वात महत्त्वाचे आहे. - महाबली शेरा