Join us

शाळेच्या विद्यार्थ्यांची बेस्ट बस बंद करू नका; सुनील प्रभू यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 2:33 AM

दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने आता ३५ विद्यार्थी राहिले आहेत.

मुंबई : गोरेगाव पूर्व नागरी निवारा परिषद १-२ ते सेंट थॉमस शाळेपर्यंत धावणारी विद्यार्थ्यांसाठीची बससेवा बेस्टने बंद करू नये, अशी मागणी दिंडोशी विधानसभेचे स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याकडे केली आहे. मुंबईचे उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर व नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी बेस्ट मुख्यालयात पाटणकर यांची भेट घेऊन ही बससेवा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने ती बंद करू नये, अशी मागणी केली.

दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने आता ३५ विद्यार्थी राहिले आहेत. त्यामुळे ही सेवा आज १० डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय दिंडोशी बस डेपोच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे रोज सकाळी गोरेगाव (पूर्व) नागरी निवारा परिषद १-२ वरून सकाळी ६.५५ व दुपारी परतीच्या वेळी सेंट थॉमस शाळेवरून १.१५ वा. सुटणारी बस आता बंद होणार असल्याने येथील पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. पालकांच्या वतीने रूपालीकदम यांनी पालकांच्या सह्यांचे निवेदन आमदार प्रभू, उपमहापौर सुहास वाडकर व नगरसेवक तुळशीराम शिंदे यांना दिले.

टॅग्स :विद्यार्थीबेस्ट