मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षासोबत द्रोह करून ज्या कुणी नवा निर्णय घेतला आहे, त्यांनी माझा फोटो वापरू नये. परवानगीशिवाय फोटो वापरणे हे योग्य नसून त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला आहे.
पक्षात बंड करून अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या गटाने सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले आहे. तसेच मंत्रालयासमोरील प्रतापगड या सरकारी बंगल्यात या गटाने राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू केले असून त्याचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. या नव्या कार्यालयात सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज आणि बॅनरवर शरद पवार यांचा फोटो वापरला आहे. तसेच फुटलेल्या गटाच्या मंत्र्यांच्या जाहिरातीतदेखील शरद पवारांचा फोटो वापरला आहे. सुरुवातीला शरद पवार यांना वगळून अभिनंदनाचे बॅनर राज्यभरात झळकले होते. पण अजित पवार यांनी स्वतः शरद पवार यांचा फोटो टाकण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली.
पक्षाच्या विचारधारेच्या परस्पर विरोधी भूमिका घेतली ते राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना माझ्या परवानगीशिवाय द्रोह करणाऱ्यांनी माझा फोटो वापरू नये. - शरद पवार