''तुमच्या दु:खात जे विचारपूस करायला फिरकले नाहीत त्यांना मत देऊ नका''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:49 PM2019-10-10T22:49:02+5:302019-10-10T22:51:42+5:30
लोकांचे अश्रू पुसायला न येणा-या अशा लोकांना मत देऊ नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
मुंबई- कोल्हापूरला आलेल्या भीषण पुरानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी लोकांची साधी विचारपूस करायला आले नाहीत, आताही ते निवडणुकांमध्ये फिरकलेले नाहीत, लोकांचे अश्रू पुसायला न येणा-या अशा लोकांना मत देऊ नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासपा महायुतीचे 160-कांदिवली पूर्व मतदारसंघातील उमेदवार अतुल भातखळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
ठाकूर कॉम्प्लेक्समधील 90 फिट रोड वर आयोजित केलेल्या या सभेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भातखळकर यांच्यासह उत्तर मुंबईतील भाजप महायुतीचे उमेदवार योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, ठाकूर रमेश सिंह, शिवसेनेचे प्रकाश सुर्वे तसेच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व्यासपीठावर होते. महायुतीच्या कार्यकर्त्यांनीही सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेवर या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
नरेंद्र मोदी यांनी भाजप सत्तेवर आल्यास देशाचा राजकीय एजेंडा बदलेन असे आश्वासन २०१३ मध्ये देशाला दिले होते. स्वातंत्र्यानंतर धर्म-जात-भाषा-प्रांत या विषय़ांभोवती फिरणारे राजकारण त्यांच्या प्रयत्नांमुळे विकास, अनुशासन आणि राष्ट्रवाद या विषयांभोवती फिरते आहे. जिथे जिथे भाजपचे राज्य आहे तिथे नक्षलवाद, दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली जात आहे. काँग्रेसच्या केंद्रातल्या दहा वर्षातल्या आणि राज्यातल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत ठिकठिकाणी बाँब स्फोट होत होते. लोक मारले जात होते. परंतु भाजपाची सत्ता आल्यानंतर देशातले वातावरण बदलले. एकही बॉम्बस्फोट झाला नाही. देशाविरोधात डोळे वटारणारा पाकिस्तान आज जगभरात कटोरा घेऊन फिरताना दिसत आहे. म्हणूनच देशात आणि राज्यात सुशासन देणा-या भाजप आणि मित्र पक्षांच्या युतीला सत्तेवर बसवा असे आवाहन त्यांनी केले.
२४ ऑक्टोबरला दिपोत्सव साजरा करा
२६ तारखेला अयोद्धेत भव्य दिपोत्सवर होणार आहे, ५ लाख ५१ हजार दिव्यांची आरास केली जाणार आहे. त्याची रंगीत तालीम २४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाचा दिपोत्सव करून करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
लाखाच्या फरकाने विजयी होईन
सभेच्या सुरूवातीला मतदार संघात गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या आधारे लाखापेक्षा जास्त फरकाने विजयी होऊ असा विश्वास अतुल भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला. कांदिवलीतील या विराट सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केले असून विजयी झाल्यावर जनतेची पूर्ण क्षमतेने सेवा करेन असे ते म्हणाले.