‘जागृत होण्यासाठी आपत्तीची वाट पाहू नका’, कचरा समस्येला व्यवस्थेएवढाच मुंबईकरही जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:43 AM2017-09-09T03:43:12+5:302017-09-09T03:43:38+5:30
मुंबईत २९ आॅगस्टला पडलेल्या मुसळधार पावसाने प्रशासनासह मुंबईकरांना खडबडून जागे केले; आणि पुन्हा एकदा नालेसफाई, कचरा आणि प्लास्टिकच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
अक्षय चोरगे
मुंबई : मुंबईत २९ आॅगस्टला पडलेल्या मुसळधार पावसाने प्रशासनासह मुंबईकरांना खडबडून जागे केले; आणि पुन्हा एकदा नालेसफाई, कचरा आणि प्लास्टिकच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. तुंबलेली मुंबई पाहून मुंबईकर फक्त जागाच नाही, तर ‘जागरूक’ही होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे अनेक समाजसेवी संस्था, प्रशासन व्यवस्था महाविद्यालयांमधील तरुणांनी पुढाकार घेत सुरू केलेल्या विविध मोहिमांना यश मिळत आहे. आपत्ती ओढवल्याशिवाय लोकांचे डोळे उघडत नाहीत; याची प्रचिती पुन्हा एकदा आल्याचा सूर पर्यावरणवाद्यांनी लगावला आहे.
रिव्हर मार्च सदस्य रिंपल संचला यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुंबईकर जागरूक होत आहे, हे कौतुकास्पद आहे. मात्र त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. कचरा समस्या सोडविणे ही प्रशासनासोबत मुंबईकरांचीही जबाबदारी आहे. शहर पुन्हा तुंबू द्यायचे नसेल तर नद्या आणि नाले वाचवणे गरजेचे आहे. त्यावर होणारे अतिक्रमण रोखले पाहिजे. शहरात २६ जुलैसारखा मोठा पाऊस पडला नाही तरी शहर तुंबले, त्याने शहराच्या नाले व्यवस्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पर्यावरण तज्ज्ञ आणि भवन्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य परवीश पंड्या म्हणाले की, मुंबईकर जागरूक होऊ लागला आहे. मात्र त्यास जागरूक होण्यासाठी आपत्ती यावी लागणे हे निंदनीय आहे. जागरूक झालेल्या मुंबईकरांची संख्या कमी असली तरी त्यामुळे बदल घडेल. त्यांना पाहून इतर लोकही स्वत:हून पुढाकार घेतील. आपण प्रत्येकानेच शहराचा आणि इथल्या पर्यावरणाचा विचार करायला हवा. सर्वांनी कचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये प्रशासनाला सहकार्य करावे. शहराचा कायापालट होण्यासाठी मुंबईकरांच्या मनामध्ये मोठी क्रांती होण्याची आवश्यकता आहे.