ढोकळा नको, वडापाव हवा; सोशल मीडियावर रंगला मराठी विरुद्ध गुजराती वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:30 AM2024-05-13T09:30:46+5:302024-05-13T09:31:53+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी आणि गुजराती वाद आता सोशल मीडियावरही रंगू लागला आहे. ‘ढोकळा नको, वडापाव हवा’, ‘मी महाराष्ट्राचा! महाराष्ट्र माझा!’ अशा पोस्ट सोशल मीडियावर झळकल्या आहेत. मराठी - गुजराती वादावर प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी परखड मत व्यक्त केल्याने वाद -प्रतिवाद सुरू झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
मुंबईच्या काही मतदारसंघात हा वाद प्रामुख्याने दिसून येत आहे. ‘मराठी माणसाने अर्ज करू नये’, अशा आशयाची नोकरीची प्रसिद्ध झालेली जाहिरात, गुजराती सोसायटीत प्रचार पत्रके वाटण्यास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना झालेला कथित मज्जाव, अशा काही घटनांमुळे मराठी - गुजराती वादाला पुन्हा फोडणी मिळाली.
उद्धवसेना आणि शरद पवार गटाने सोशल मीडियावर या वादाला तोंड फोडले आहे. निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय न पटल्यामुळे काही दिवसांपूर्वीच मनसेतून ठाकरे गटात प्रवेश केलेले कीर्तिकुमार शिंदे यांनी या वादावर ‘ढोकळा नको. वडापाव हवा.’ (मराठी माणसाचे सामूहिक शहाणपण) अशा आशयाची पोस्ट टाकून या वादावर टिप्पणी केली आहे. आज पुन्हा एकदा मराठी माणसाची, इथल्या भूमिपुत्रांची एकजूट होणे गरजेचे आहे. सुदैवाने राजकीय भान जागे असलेल्या इथल्या मराठी मतदारांमध्ये पुन्हा एकदा तशीच एकजूट होताना दिसत आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शरद पवार गटाच्या स्टुडंट विंगचे अमोल मातेले यांनीही महाराष्ट्रातील किती उद्योग अलीकडच्या काळात गुजरातला गेले याची जंत्री असणारी पोस्ट टाकून पोस्टच्या शेवटी,’ हे वाचा, विचार करा आणि मतदानाला जा... ‘मी महाराष्ट्राचा! महाराष्ट्र माझा! तमाम मराठी बांधवांना आठवण करून देत आहे! अशी ओळ टाकली.
हा वाद निर्माण होणे दुर्दैवाचे आहे, मराठी माणसाला नोकरी नाकारणे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विशिष्ट भाषिक सोसायटीत पत्रके वाटण्यास मनाई करणे, हे प्रकार योग्य नाहीत. सर्वानी सलोख्याने राहिले पाहिजे. - वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष.
मुंबईत कुठेही मराठी-गुजराती असा वाद नाही, विरोधकांकडे प्रचाराला मुद्दे नाहीत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यामुळे ते हा वाद विनाकारण उकरून काढला जात आहे. - भालचंद्र शिरसाट, भाजप प्रवक्ते