लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना देशातही सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनच्या साठ्याविषयीही सूचित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा असल्याने चिंता नसल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. तसेच काही नागरिकांचा या कारणाने मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व मुख्य रुग्णालयात ऑक्सिजनचे प्लांट उभारण्यास सांगितले होते. त्यासाठी निधी पुरविला गेला होता. मात्र कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने फार कमी प्रमाणात ऑक्सिजनचा वापर होत होता. केंद्राने राज्य सरकारला ऑक्सिजनच्या बाबतीत सूचना दिल्यानंतर राज्याने सर्व आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
टंचाई भासणार नाही
सध्या रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होत असते. तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनची सद्यस्थितीत गरज नाही. मुंबईत कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळी काही विशिष्ट कालावधीसाठी १०० ते १५० मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची गरज होती. मात्र बहुतांश मुख्य रुग्णालयांत आता ऑक्सिजन प्लांट असल्याने ऑक्सिजनची टंचाई भासणार नाही, असे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"