मुंबई - मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर 'पोलीस' अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
पत्रकार, न्यायाधीश आणि बहुतांश पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलीस' अशी पाटी लावलेली असते. मात्र, अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी याचा वापर केला जातो. आता, यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2013 च्या कलम 134 प्रमाणे यावर कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या 7 दिवसात कुणावर कारवाई केली, याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काही काळात अशी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळेल.
न्यायाधीशांसाठीही नियम
न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर 'न्यायाधीश. असं लिहिता येणार नाही. याबाबत मुंबई हायकोर्टाने परिपत्रक काढलं आहे. दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर नावाचा आणि पोलिसांच्या लोगोचा उल्लेख असतो. या लोगो आणि नावाचा वापर बऱ्याचदा संबंधित पोलीस, न्यायाधीश यांच्या नातेवाईकांकडूनही केला जातो. खासगी गाडी महत्त्वाच्या कामासाठी वापरुन संबंधित यंत्रणांवर दबावही टाकला जातो. तर अनेकदा नियमांची पायमल्ली केली जाते.