म्हाडा कॉलनीत राबवा सम-विषम पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:33 AM2019-12-18T00:33:55+5:302019-12-18T00:33:58+5:30

मुलुंडमधील रहिवाशांची मागणी : दुतर्फा पार्किंगमुळे होतेय वाहतूककोंडी

do odd even parking in Mhada Colony | म्हाडा कॉलनीत राबवा सम-विषम पार्किंग

म्हाडा कॉलनीत राबवा सम-विषम पार्किंग

Next

ओमकार गावंड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनी परिसरातील अनेक अरुंद रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. या रस्त्यांवर नो पार्किंग झोन नसल्याने वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात नाही. परंतु ही पार्किंग आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठा अडथळा ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. म्हाडा कॉलनीमधील आर.आर. एज्युकेशन ट्रस्ट मार्गावरून नागरी वस्त्यांमध्ये जाणारे हे मार्ग अरुंद आहेत. त्यात या मार्गांवर वाहनांची दुतर्फा पार्किंग असल्याने या मार्गावरून मोठे वाहन येण्यास अडचण निर्माण होत आहे.
सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास म्हाडा कॉलनीमधील जय मल्हार सोसायटी आवारातील मीटर केबिनला आग लागली होती. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु तब्बल पाऊण तासाने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. यावेळी रहिवाशांनी मेन लाइन बंद केल्याने आग आटोक्यात आली. कुणालाही इजा झाली नाही. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी वेळेत पोहोचले होते. परंतु प्रियंका गल्ली येथील मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी येऊ शकले नाही. भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन यंत्रणेला पार्किंगला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सम-विषम पार्किंग राबविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

४ वर्षांपूर्वी याच ठिकाणी आग लागली होती. तेव्हा देखील अग्निशमन दलाचे वाहन पार्किंगमुळे आत येऊ शकले नव्हते. त्यानंतर आम्ही वाहतूक विभागाला सम-विषम पार्किंग राबविण्यासाठी पत्र व्यवहार केला होता. संभाव्य धोका लक्षात घेता येथील परिसरात पार्किंगसंबंधी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.
- रवी नाईक, अध्यक्ष, म्हाडा अध्यक्ष, म्हाडा कॉलनी असोसिएशन

कॉलनी असोसिएशन
आर. आर. एज्युकेशन ट्रस्ट मार्गावरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्यासाठी रायडर नेमला आहे. या विभागातील रस्त्यांवर सम-विषम पार्किंग राबविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.
- कुंडलिक कायगुडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग विक्रोळी

Web Title: do odd even parking in Mhada Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.