करू या पौष्टिकतेशी मैत्री

By admin | Published: November 13, 2016 03:46 AM2016-11-13T03:46:16+5:302016-11-13T03:46:16+5:30

मुलांना पौष्टिक काय खायला द्यायचे, हा माझ्यासह अनेक आयांना सध्या भेडसावणारा प्रश्न आहे. मॅगी, पिझ्झाच्या भाऊगर्दीत मुलांना पौष्टिक अन्न मात्र दिले गेले पाहिजेच.

Do or Nurture Friendships | करू या पौष्टिकतेशी मैत्री

करू या पौष्टिकतेशी मैत्री

Next

- भक्ती सोमण

मुलांना पौष्टिक काय खायला द्यायचे, हा माझ्यासह अनेक आयांना सध्या भेडसावणारा प्रश्न आहे. मॅगी, पिझ्झाच्या भाऊगर्दीत मुलांना पौष्टिक अन्न मात्र दिले गेले पाहिजेच. हे पदार्थ देण्यासाठी अनेक रंगतदार आणि चविष्ट क्लुप्त्या वापरण्याची सध्याची गरज आहे. त्याची सुरुवात मात्र, बालदिनापासून करू या.

गेल्या आठवड्यात चार दिवस गुहागरला गेले होते. निसर्गाच्या, समुद्राच्या सानिध्यात मजा करायला अनेक कुटुंबे तिथे आली होती. दोन-तीन दिवस मुक्काम असल्याने सगळ््या मुलांची आपसूकच गट्टी जमली. त्या मुलांमध्ये एक चौथीतला जय हा मुलगाही होता. बोलघेवड्या असलेल्या जयशी लगेच मैत्री झाली. शाळेच्या, मित्र-मैत्रिणींच्या गमती-जमती सांगताना आमची गाडी खाण्यावर सरकली. त्याला पिझ्झा, पास्ता, वडे, उपमा असे सगळे खायला जाम आवडतं म्हणे. इतकेच नाही, तर माझ्या आईच्या हातच्या टेस्टी भाज्या खायला लवकर ये, असेही त्याने सांगितले. गप्पांमधून त्याला उसळी अजिबातच आवडत नाहीत हे लक्षात आले. जाम बोरींग लागतात त्या... असे त्याने म्हटल्यावर उसळींची एक गंमत त्याला सांगितली. उसळीत कांदा, टॉमेटो फरसाण आणि थोडसं चीज एकत्र करून त्याला ते पोळीबरोबर खाऊन बघायला सांगितलं. ही आयडिया त्याला जाम आवडली मात्र, हा प्रकार मी पावाबरोबर खाईन, असे तो म्हणाला. यावरून आमच्या बोलण्यातून एक मात्र, प्रकर्षाने लक्षात आले, मुलांना एखादा पदार्थ जरा बदलून आणि आकर्षक सजावट करून दिला, तर तर तो ते आवडीने खातात.
अगदी खरं सांगायचं, तर सध्या माझ्यासकट सगळ््या आर्इंची तक्रार ही मुलं पौष्टिक काही खात नाहीत, त्यांना कोरडेच खायला आवडते ही आहे. त्यांना जबरदस्ती तर करावीच लागते. प्रसंगी पोळी-भाजी खा, म्हणून ओरडावे लागते. माझ्या घरचेच उदाहरण द्यायचे, तर माझ्या मुलाला मॅगी मात्र फार आवडते. ही सवय कशी घालवायची, याचा आपोआप मार्ग मॅगी बंद झाल्यामुळे मिळाला होता. मग त्याला मैद्यापासून बनवलेल्या पॅनकेकऐवजी डाळीच्या पिठाचा घावन पॅनकेक म्हणून दिला. इतरही अनेक पर्याय अवलंबून पाहिले, पण तरी रोज पौष्टिक काय द्यायचं, हा प्रश्न मात्र खूप मोठ्ठा आहे. असेच काहीसे वातावरण आजकाल सर्वच घरात आढळते.
आजकाल आई नोकरी करणारी असते. त्यामुळे वस्तुस्थिती अशी की, तिला रोजच चमचमीत, पौष्टिक पदार्थ करायला पुरेसा वेळ मिळतोच असे नाही.
मुलं भाजी खात नाहीत, असाही एक सूर अनेक घरांमधून उमटतो. त्यांना चीज, बटर हे प्रकार खूप आवडतात. मग भाज्या चीज एकत्र करून काही पदार्थ करणे खूप फायद्याचे ठरते. पौष्टिकतेचा विचार केला, तर एक चांगला पर्याय म्हणजे पराठा. हा पराठा अगदी रोजच खायला दिला पाहिजे, असे अजिबातच नाही, पण जेव्हा घरी मुलांच्या नावडती भाजी असेल, तेव्हा मात्र, त्या भाजीचा पराठा करणे, हे केव्हाही उत्तमच. मुलांना साधारणपणे कोबी, शिमला मिरची या भाज्या फारशा आवडत नाहीत. अशा वेळी कोबी अगदी बारीक किसून वा चिरून त्यात चीज घालून कणकेत भरून त्याचे छान खमंग पराठे चीजमुळे मुले खातातच, तर मेथी, पालक यांचेही पराठे असेच पौष्टिक होतात, हे काही वेगळे सांगायला नकोच. सध्या तर हॉटेलांमध्येही पराठ्यांचे असंख्य प्रकार मिळतात. तेच जरा टिष्ट्वस्ट देऊन घरी करता येऊ शकतात.बटाटा, कांदा, फ्लॉवर, गाजर, मुळा, मटार, बेबी कॉर्न, मशरूम, कांद्याची पात अशा अनेक भाज्यांची आपली अशी चव आहे. या प्रत्येक घटकात पौष्टिकतेचे मूल्य सामावलेले आहे. त्यामुळे आलटून-पालटून या भाज्यांचे पराठे कधी पनीर, तर कधी चीज घालून देणे फायद्याचे ठरू शकते. फक्त चीज घालून केलेल्या पराठ्याची चवही अफलातून लागते. त्याचबरोबरीने मुलांना कधी घावन, आंबोळ््या, शिरा, पोहे डोसे, इडल्या, सँडवीच अशा पदार्थांत बदल करून द्यायला हवे. मुलांना साधारणपणे रंगतदार जेवण खूप आवडते. त्यामुळे या पदार्थांत त्यांच्या आवडीच्या भाज्या घालून देता येईल. आंबोळ््यांबरोबर चॉकलेट वा स्ट्रोबेरी सिरप, क्रशही चांगला लागतो. आकर्षक रचना असेल, तर मुलांना जास्त आवडते.
मुलांच्या वाढत्या वयाचे महत्त्व लक्षात घेता, परिपूर्ण आहार त्यांना देणे हे अत्यंत गरजेचेचे आहे. म्हणूनच की काय, आपल्या मुलांनी पौष्टिक पदार्थ खावेत, यासाठी जेवढी कल्पकता लढवावी लागेल, तेवढी कमीच असते, पण आपल्या मुलासाठी पदार्थ करताना गृहिणीला निश्चितच एक समाधान असते. त्याच समाधानात मुलांनी पसंतीची मस्त पावती दिली की, त्या गृहिणीला कृतकृत्य वाटते, हो ना!

मुलांनाही वाव द्या : आजकाल मुलांना स्वत:च्या गोष्टी स्वत: करून बघायला हव्या असतात. टीव्हीमुळे तर आपणही पदार्थ करून बघावेत, असेही त्यांना वाटत असते, पण धोका म्हणून आपण त्यांना चिरायला केव्हा गॅसपाशी जायला देत नाही, पण हळूहळू पालकांनी मुलांची आवड बघत, त्यांनाही करायला संधी दिली पाहिजे. संधी मिळाली, तर मूल अनेक चांगले आणि सोप्पे पदार्थ बनवू शकतात आणि ते चवीलाही मस्त असतात. त्यांच्यातल्या जिज्ञासेमुळे अन्नाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बराच सकारात्मक झाला असल्याचे शेफ तुषार देशमुख यांनी सांगितले.

असा देऊ टिष्ट्वस्ट
- मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत, त्या भाज्यांची टिक्की करावी. बर्गर देताना मात्र चीज भरपूर घालावे.
- घरी पिझ्झा करताना पिझ्झा बेस कणकेचा करावा. पोळी करताना लाटतो तशी थोडी जाडसर पोळी लाटून, भाजून त्यावर आवडते टॉपिंग घालता येईल.
- फ्रूट ज्यूस देताना एक आवडते, एक नावडते अशी फळे एकत्र करून त्यात चॉकलेट सिरप घालून देता येईल.
- भोपळ््याची भाजी तर त्यांना अजिबात आवडत नाही. ती भाजी अगदी मऊ शिजवून त्याच्या गोड पुऱ्या वा पराठे होतील.
- घरी केक करत करताना मैद्याऐवजी कणीक, रवा, नाचणीचे पीठ यांचा वापर करत केक करता येईल.
- कडधान्ये आवडत नसतील, तर मोड आलेली कडधान्ये शिजवून, त्याची पेस्ट करून त्यात आवडीचे पीठ, भाज्या घालून घावन करता येईल.

Web Title: Do or Nurture Friendships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.