नवं 'राज'कारण?; छगन भुजबळांच्या सुटकेसाठी राज ठाकरेंचं बळ, आंदोलनाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 04:51 PM2018-02-05T16:51:47+5:302018-02-05T16:56:49+5:30
राज यांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून छगन भुजबळ तुरुंगात आहेत. अनेकदा जामिनासाठी अर्ज करूनही न्यायालयाने त्यांना आजवर दिलासा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी सोमवारी कृष्णकुंज येथे जाऊन राज यांची भेट घेतली. आमचा विकास तुरुंगात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, अशी व्यथा त्यांनी राज यांच्यासमोर मांडली. तेव्हा राज यांनी 'आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे', असा आदेशवजा सल्ला भुजबळ समर्थकांना दिला.
भुजबळ यांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. मात्र, या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार का, याबाबतची भूमिका राज यांनी स्पष्ट केलेली नाही. तेव्हा आगामी काळात राजकीय पटलावर नवीन समीकरणे पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
छगन भुजबळ १७ मार्च २०१६ पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. तेव्हापासून त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले नाही. याचाच अर्थ त्यांच्या ताब्याची आवश्यकता नाही. तसेच भुजबळ यांच्यावर २७ एप्रिल २०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेले एक वर्ष भुजबळ कारागृहातच खितपत पडून आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी मध्यंतरी त्यांच्या वकिलांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाने 'ईडी'ला याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.