मुंबई : तरुणांनी संशोधनावर भर दिला पाहिजे. संशोधन करताना, नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार आणि वापर करणे गरजेचे आहे. संशोधन करताना फक्त वेगळेपणा आणण्यासाठी म्हणून वेगळ्या पद्धतीने संशोधन करू नका. तर, समोर एक ध्येय ठेवून संशोधन करा. नक्कीच हे संशोधन वेगळे होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.व्हीजेटीआय महाविद्यालयातील एका कार्यक्रमात प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या वेळी प्रभू यांनी तरुणांना बदल घडवायचा असल्यास स्वत:मध्ये बदल घडवा असा कानमंत्र दिला. प्रत्येकाने समाजाला काहीतरी दिले पाहिजे. यासाठी स्वत:त बदल केले पाहिजेत. समाजात बदल घडवून आणण्यासाठी ख्रिसमसनिमित्ताने स्वत:मध्ये बदल घडवला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान हे मानवासाठी उपयुक्त तसेच घातकही आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान निर्माण करताना व्यक्तींना उपयुक्त ठरेल हा विचार केला पाहिजे. प्रभू म्हणाले, सध्या जागतिक स्तरावर अस्तित्व दाखवून देण्याचे सामर्थ्य देशाकडे आहे. त्यामुळे तरुणांसह सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती, मनुष्यबळ व तंत्रज्ञान यांचा मेळ घातला पाहिजे, यामुळे प्रगती होईल. पुढच्या ८ ते १० वर्षांत भारत महासत्ता बनू शकतो आणि त्या वेळी जगात तिसºया क्रमांकावर देश असणार आहे. आर्थिक महासत्ता झाल्यावरही आपली मूल्य, संस्कृतीचा विसर पडू द्यायचा नाही़
ध्येय ठेवून संशोधन करा, फक्त वेगळेपणासाठी नको - सुरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:10 AM