शिवरायांच्या गड किल्ल्यांना भेटी दया - आप्पा परब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 09:25 PM2024-05-26T21:25:47+5:302024-05-26T21:26:10+5:30
शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व अनुभवताना मुंबईकर भरावले
श्रीकांत जाधव, मुंबई : लेखक अनिल नलावडे यांची शिवप्रताप उभा करणारी गाणी आणि त्याला पद्मश्री राव यांचे इतिहासाचे संदर्भ देणारे भारदस्त निवेदनातून उभा करण्यात आलेल्या 'संगीत शिवस्वराज्य गाथा' कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व मुंबईकरांसमोर रविवारी अनुभवता आले. शिवरायांचे प्रताप आठवताना संपूर्ण सावरकर सभागृहात शिवचैत्यन उसळले होते.
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दादर येथील वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात 'संगीत शिवस्वराज्य गाथा' या विशेष कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले. यावेळी गाणी आणि चित्रफितीच्या माध्यमातून लेखक अनिल नलावडे आणि पद्मश्री राव यांचे भारदस्त निवेदनाने संगीत शिवस्वराज्य गाथेचा कार्यक्रम सादर करण्यात आला. नचिकेत देसाई, श्रीरंग भावे, दीप्ती आंबेकर यांनी गाणी सादर केली. तसेच पांडुरंग गुरव यांच्या तुतारीने संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते. या कार्यक्रमात मराठी संवर्धन मंडळाच्या सुप्रिया दरेकर, उद्योजिका सोनाली बाणे, उदय आजगावकर, सोमनाथ परब आदींचा गौरव करण्यात आला. यानिमित्त शिवकालीन कलादालन आणि चित्रकाव्य दालन उभारण्यात आले.
- शिवरायांच्या गड किल्ल्यांना भेटी दया - आप्पा परब ( बॉक्स )
या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या मार्गदर्शन भाषणात परब यांनी शिवरायांच्या गड किल्यांचा इतिहास जागवला. शिवचरित्र माणसाला कसे जगावे आणि कसे मरावे हे शिकवते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते तुम्हाला आधार देते. तेव्हा बाह्य जीवनामध्ये मंचावर केल्या जाणाऱ्या जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा केवळ राजकीय
असतात. तेव्हा महाराजांनी बांधलेले गड किल्ल्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष शिवप्रताप अनुभवावा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित शिवप्रेमीना केले.