पाणीस्रोतांचे संवर्धन करूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 06:24 AM2017-12-31T06:24:59+5:302017-12-31T06:25:09+5:30
मुंबईत गरजेपेक्षा जास्त पाणी आहे, ते सर्वांना समन्यायी वाटप करूयात. पाणीस्रोतांचे संरक्षण व संवर्धन करूयात. पाण्याचा अमानवी वापर करणारे तंत्रज्ञान नाकारूयात. द्वेष व हव्यास याला नाकारून माणुसकीला संवर्धित करूयात.
- सीताराम शेलार
शहराला आजच्या तारखेत आणि पुढील २० वर्षे पाण्याची कमतरता भासणे केवळ अशक्य आहे. जल अभियंता खात्याच्या आकडेवारीनुसार, आज मुंबईत दररोज ४१४ कोटी लीटर पाणी येते आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून ३८१ कोटी लीटर पाणी मुंबईकरांना दररोज मिळते. राष्ट्रीय मानकानुसार दीड कोटी मुंबईकरांना प्रत्येकी १३५ लीटर पाणी दररोज दिले, तरी २०१ कोटी लीटर पाणी लागेल आणि १८० कोटी लीटर पाणी उरेल. याचा विपरीत परिणाम मात्र असा आहे की आपण अशा शेकडो आलिशान इमारती बनवीत आहोत, ज्यांच्या प्रत्येक घरात एक छोटेखानी तरणतलाव असेल. उच्चभ्रू मुंबईकर अभिमानाने त्यास ‘इन्फिनिटी पूल’ असे संबोधतात. याच वेळी मुंबई मनपा पाणीपुरवठा करत नसल्याने अंदाजे २५ लाख मुंबईकर पाणी माफियांवर अवलंबून आहेत. हे पाणी माफिया त्यांना १०० लीटर पाणी ५० ते ६० रुपयांत विकतात. म्हणजे १ हजार लीटर पाण्यासाठी ते कमीत कमी ५०० रुपये मोजतात. दुसºया बाजूला देशातील सर्वात श्रीमंत माणूस १ हजार लीटर पाण्यासाठी केवळ ५ रुपये मोजतो.
(लेखक पाणी हक्क समितीचे समन्वयक आहेत.)