तुम्हालाही टपाल विभागासाेबत काम करायची इच्छा आहे का? अशा प्रकारे मिळेल संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 09:55 AM2024-01-27T09:55:40+5:302024-01-27T10:02:29+5:30
जुन्या पिढीचे विश्वासाचे नाते.
मुंबई : टपाल विभागाशी जुन्या पिढीचे विश्वासाचे नाते आहे. त्यानंतर आता टपाल विभागाने काळानुरूप कात टाकल्याने तरुणपिढीही या विभागाकडे वळते आहे, मात्र केवळ गुंतवणूक आणि कर्जासाठी या तरुण पिढीने टपाल विभागावर अवलंबून न राहता थेट विभागासोबत काम करण्यासाठी संधी मिळणार आहे. टपाल विभागाची फ्रेंचायझी घेऊन सर्वसामान्यांना पोस्टाच्या सेवा देता येणार आहेत, त्यामुळे ही संधी न दवडता अर्ज करण्याचे आवाहन विभागाने
केले आहे.
असा करा अर्ज :
१ फेब्रुवारीपासून फ्रेंचायझीसाठी अर्जदार अर्ज करू शकतात. व्यक्ती तसेच संस्था, संघटना, अन्य संस्था जसे कोपऱ्यावरील दुकान, पानवाला, किराणावाला, लेखन साहित्याची दुकाने, छोटे दुकानदार अर्ज करू शकतील. यासाठी १८ पेक्षा अधिक वय असणे बंधनकारक आहे. टपाल विभाग व्यक्ती, संस्था भारतीय डाकसोबत करार करेल.
फ्रेंचायझीत नेमके काय मिळणार :
अंतर्देशीय स्पीड पोस्टचे बुकिंग नॉन-सीओडी (कागदपत्रे आणि पार्सल), अंतर्देशीय रजिस्टर पत्रे, ई मनी ऑर्डर, टपाल तिकीट आणि लेखन साहित्याची विक्री, महसूल स्टॅम्पची विक्री, केंद्रीय भरती शुल्क स्टॅम्प इ.सह किरकोळ सेवा, पोस्टल जीवन विमा उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून कार्य करणे आणि प्रीमियम संकलनाच्या सेवा प्रदान करणे. टपाल विभागीय प्रमुख हे फ्रेंचायझीला संलग्न करण्यासाठी सक्षम अधिकारी असतील.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त शाळेतून दहावी उत्तीर्ण, स्थानिक भाषा आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेली; संगणक साक्षर; स्मार्ट फोन वापराबाबत परिचित; वैध पॅन क्रमांक असलेली व्यक्ती फ्रेंचायझीसाठी अर्ज करू शकते. अर्जदाराला टपाल कार्यालयात सुरक्षा ठेव म्हणून रुपये दहा हजार रुपये जमा करावे लागतील.
असे मिळेल कमिशन :
प्रत्येक रजिस्टर पत्रासाठी तीन रुपये , दोनशेपेक्षा जास्त मूल्याच्या प्रत्येक मनी ऑर्डरसाठी पाच रुपये, टपाल तिकीट आणि लेखन साहित्य विक्रीवर पाच टक्के कमिशन मिळेल. बुक केलेल्या स्पीड पोस्ट लेखासाठी कमिशन दर अतिशय आकर्षक आहे आणि फ्रेंचायझी त्याने केलेल्या मासिक व्यवसायाच्या ७ ते २५ टक्के कमिशन मिळले.