विक्रेते दारोदारी; बाजारपेठेत उठाव नसल्याने दर पडले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला न परवडणारा आंबा यंदा बराच स्वस्त झाला आहे. मात्र, संचारबंदीमुळे बाजारपेठेत वेळमर्यादा पाळावी लागत असल्याने ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना गल्लोगल्ली हिंडून ग्राहक शोधावे लागत आहेत.
काही व्यापाऱ्यांनी आंबा विक्रीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. विविध ग्रुपमध्ये जाहिरात करून ग्राहक मिळवायचे आणि त्यांना घरपोच आंबे पोहोचवायचे, अशी शक्कल ते लढवीत आहेत. स्थानिक विक्रेते मात्र दारोदार हिंडून ग्राहक शोधताना दिसत आहेत. नेहमीपेक्षा स्वस्त दर आणि निवडून घेता येत असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोनामुळे ग्राहकसंख्या कमी झाल्याने आंब्याचे दर पडले आहेत. अन्यथा यंदा उत्पादन कमी आल्याने चांगला भाव मिळाला असता, अशी प्रतिक्रिया आंबा उत्पादकांनी ‘लोकमत’ला दिली.
* ग्राहकांनी फिरविली पाठ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ७ ते ११ या वेळेत दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, या वेळमर्यादेमुळे ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांसह विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सायंकाळच्या वेळेसही आंबा विक्रीस परवानगी आणि ग्राहकांना बाजारपेठेत येण्याची मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
* पदरी निराशाच...
अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, थंडीचे विषम प्रमाण आदी कारणांमुळे चांगला मोहर धरला नाही. १८ आणि १९ फेब्रुवारीला काही भागांत अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्याने झाडावरील आंबे गळून पडले. शिवाय भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळ काळवंडण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे यंदा ३० ते ४० टक्के उत्पादन मिळाले. मागणी वाढून चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती; परंतु कोरोना काळातील निर्बंधांमुळे शेतकरी आणि विक्रेत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ
.................
यंदा उत्पादन कमी आल्याने चांगला दर मिळण्याची अपेक्षा होती; परंतु कोरोनाने भ्रमनिरास केला. मिळणाऱ्या पैशातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
- प्रभाकर सावंत, शेतकरी
........
आंबा हे पीक खर्चिक आहे. आसपासच्या झुडपांची छाटणी, फवारणी, काढणी आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च येतो. यंदा एका आंब्यामागे ५० रुपये उत्पादन खर्च आला. त्या तुलनेत हाती आलेले पैसे फारच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.
- हरिश्चंद्र गावकर, शेतकरी
............
प्रकार .......रिटेल .........होलसेल
रत्नागिरी हापूस - ५५० ते ६०० ......४५० ते ५००
कर्नाटकी हापूस - २०० ते २२० ........१०० ते १५०
पायरी - ५५० ते ६०० ...........४५० ते ५००
मानकुराद - ५०० ते ५५० ..........४५० ते ५००
राजापुरी - २५० ते ३०० .........२०० ते २२०
गावठी - १०० ते १२० ..........८० ते ९०
(दर डझनांत)
.................
मागील वर्षीचे दर
हापूस - ७०० ते ८००
पायरी - ७००
मानकुराद - ६००
-----------------------------