मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 24 दिवस उलटले असताना सुद्धा सत्तास्थापनेचा तिढा काही सुटायला तयार नाहीत. त्यातच आता भाजप-शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपाची युती खूप जुनी आहे. प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फॉर्म्युल्यानुसारच आजपर्यंत युती टिकून आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, असेही दानवेंनी म्हटले. यावेळी, जावयाच्या पराभवावरही दानवेंनी मजेशीर उत्तर दिले.
विधानसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर चर्चेत असलेल्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरणारे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचासुद्धा कन्नड मतदारसंघातून पराभव झाला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात जातीयसमीकरणाचे चित्र फिरले आणि हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा मिळालेला पाठींबाचं त्यांना भोवला. त्यामुळे जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या पराभवाबाबत रावसाहेब दानवेंनी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, दानवेंनीही मिश्कीलपणे उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत जावयाच्या पराभवाचं दु:ख वाटतंय का? असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, भाजपाचे अनेक उमेदवार जावयापेक्षा कमी मताने पडले आहेत, त्याचे जास्त दु:ख वाटते, असे दानवेंनी म्हटले. त्यानंतर, पत्रकारांमध्ये हशा पिकला. तसेच, विनोद तावडेंचं तिकीटा का नाकारलं हाही प्रश्न दानवेंनी विचारण्यात आला होता. मात्र, तुमचे कॅमरे सुरू आहेत, असे म्हणत या प्रश्नावर उत्तर देणं दानवेंनी टाळलं.
दरम्यान, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांना निवडून देण्याची आमच्याकडून चूक झाली असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला दानवे यांनी उत्तर दिले असून, सत्तार यांच्या डोक्यावर अजून पाच वर्षे केस उगवण्याची शक्यता कमी असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.