Join us

मेट्रोच्या कारशेडसाठी जागा देता का जागा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 3:03 AM

एमएमआरडीएचा शोध सुरू : मेट्रो ‘रुळावर’ येण्यास विलंब होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईच्या विकासाची ‘नाडी’ समजल्या जाणाऱ्या एमएमआरडीएमार्फत शहर आणि उपनगरांत सध्या मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. प्रस्तावित पाच मेट्रो प्रकल्पांपैकी दोन मेट्रो प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा विद्यमान सरकारचा मनोदय आहे. असे असले, तरी मेट्रोच्या कारशेडसाठी अद्याप जमीन मिळत नसल्यामुळे प्रत्यक्षात मेट्रो ‘रुळावर’ येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

सध्या दहिसर पश्चिम ते डी. एन. नगर ही मेट्रो-२ अ मार्गिका, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली ही मेट्रो-४ मार्गिका, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (जेव्हीएलआर मार्गे) मेट्रो-६ मार्गिका आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो-७) मार्गिका अशा पाच मार्गिकांचे काम सुरू आहे. यापैकी मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या मार्गिकांच्या कामांना गती आली असून, ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. मेट्रोचे मार्ग जरी वेळेत तयार झाले, तरी कारशेडअभावी यांत्रिकी कामे (मेकॅनिकल वर्क) सुरूहोणे अवघड आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मेट्रो धावण्यासाठी लवकरात लवकर कारशेड उभारणे गरजेचे आहे, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई