सिग्नलवर उभे राहिल्यास बक्षीस द्यायचे का?; आदित्य ठाकरेंनी घेतली शेलारांची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:48 AM2020-03-12T02:48:22+5:302020-03-12T02:49:02+5:30
प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्यांवर शासन कारवाई करते पण अजिबात प्रदूषण न करणाºया कारखान्यांना काही बक्षीस देण्याची योजना शासन आणणार का असा सवाल आशीष शेलार यांनी केला.
मुंबई : एखादा मोटारचालक सिग्नलवर थांबला म्हणून त्याला बक्षीस देणार का? असा साधा प्रश्न विचारत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपचे आशीष शेलार यांची बुधवारी चांगलीच फिरकी घेतली.
मौजे शेलार (ता.भिवंडी) येथील कारखान्यांमधून होत असलेल्या प्रदूषणाबाबतचा मूळ प्रश्न शांताराम मोरे यांनी उपस्थित केला होता. सुनील प्रभू यांनी त्या पाच कारखान्यांची यादी ठाकरे यांना दिली. या कारखान्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्यांवर शासन कारवाई करते पण अजिबात प्रदूषण न करणाºया कारखान्यांना काही बक्षीस देण्याची योजना शासन आणणार का असा सवाल आशीष शेलार यांनी केला. त्यावर, ‘नियम पाळणे हा कर्तव्याचाच भाग असतो. कारखाने प्रदूषणमुक्त असावेत हीच कायद्याची अपेक्षा आहे. कायदा पाळला जात असेल तर बक्षीस कशासाठी द्यायचे? एखादा मोटारचालक सिग्नलवर नियमानुसार थांबला म्हणून त्याला बक्षीस देण्यासारखे होईल, अशी फिरकी घेत आदित्य ठाकरे यांनी, अशी बक्षीस योजना राबविण्याचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले. या फिरकीची चर्चा दिवसभर रंगली होती.