मुंबई- दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस 'बेस्ट दिन' म्हणून जाहीर केला जातो. बेस्टने शहराच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत. गेल्या दिडशे वर्षांमध्ये मुंबईने ही गतीमान प्रगती केली आहे.
खरंतर मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रामची कल्पना एका अमेरिकन कंपनीने १८६५ साली मांडली होती. त्या कंपनीला त्याचा परवानाही मिळाला होता. मात्र ती योजना प्रत्यक्षात आली नाही. बॉम्बे ट्रामवे कंपनी, महापालिका, 'स्टर्न्स अँड किटरेज' कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आल्यानंतर १९७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. मुंबई प्रांतासाठी बॉम्बे ट्रामवेज अॅक्ट १८७४ संमत करुन त्यानुसार बॉम्बे
ट्रामवे कंपनीला ट्राम चालवण्याचे हक्क देण्यात आले. ९ मे १९७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. कुलाबा ते पायधुणी आणि बोरीबंदर ते पायधुणी अशा मार्गांवर धावलेल्या ट्रामसाठी केवळ तीन आणे भाडे ठरवण्यात आले मात्र कोणतेही छापिल तिकीट तेव्हा देण्यात आले नाही. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट कमी करुन ते दोन आणे करण्यात आले होते. नंतर काही महिन्यानंतर तिकिटे छापण्यात आली. स्टर्न्स अँड किटरेज कंपनीने ट्रामसाठी ९०० घोडे पाळल्याचे सांगण्यात येते.
इंग्लंडच्या 'ब्रिटीश इलेक्ट्रीक ट्रॅक्शन कंपनी'ने १९०४ साली विजेच्या वितरणाच्या परवान्यासाठी विनंती केली. त्यासाठी 'ब्रश इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग कंपनी'ने एजंट म्हणून काम पाहिले. 'बॉम्बे ट्रामवे कंपनी', 'मुंबई महानगरपालिका', 'ब्रश कंपनी' यांच्यामध्ये ३१ जुलै १९०५ रोजी करार होऊन हा परवाना देण्यात आला. १९०५मध्ये बेस्ट म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी'ची स्थापना करण्यात आली. 1907 साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करुन मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली तर 1926 साली डबलडेकर ट्रामही शहरात आली. त्यानंतर या कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 15 जुलै 1926 साली शहरात पहिली बस अपगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली.
1947 साली कंपनीते नाव 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट' असे करण्यात आले तर 1995 पासून बॉम्बेच्या जागी बृहन्मुंबई नाव वापरले जाऊ लागले. आज संपुर्ण शहरामध्ये बेस्ट सेवा दररोज हजारो लोकांना प्रवासासाठी मदत करते. उपनगरी रेल्वेगाड्यांबरोबर पूरक अशी सेवा म्हणून बेस्टने स्थान निर्माण केले आहे.