मुंबई : मुंबईतले भटके कुत्रे आणि इतर पाळीव प्राण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी तसेच प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी मुंबई पालिकेने बुधवारपासून सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांची मदत घेण्यात आल्याचे देवनार पशुधन गृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले. दर १० वर्षांनी श्वानगणना करण्यात येत असून, यापूर्वी २०१४ मध्ये श्वानगणना झाली होती.
भटक्या कुत्र्यांच्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुंबईतील भटके कुत्री आणि पाळीव प्राण्यांच्या सध्याची वास्तविक संख्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली जाईल तसेच २०१४ च्या संख्येसोबत त्याची तुलनात्मक मांडणी करण्यात येईल. याआधारे ज्या भागांमध्ये श्वानांची संख्या वाढली आहे त्या ठिकाणांसाठी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम राबवून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती पठाण दिली.
कशासाठी सर्वेक्षण :
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांना सामोरे जावे लागते.
लहान मुलांवरही केले हल्ले :
दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागत असल्याने अनेकदा अपघात होतात.
लहान मुलांवरही हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
२०१४ च्या गणनेनुसार ९५ हजार १७४ भटके कुत्रे असले, तरीही आता या संख्येत मोठी वाढ झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
त्यामुळे हे सर्वेक्षण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे.