टोपी घातलेल्या भाजपच्या या गर्भश्रीमंत नेत्याला ओळखलं का?, बालपणीच्या आठवणी जागवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:48 PM2022-05-03T12:48:27+5:302022-05-03T12:52:39+5:30
भाजपचे मुंबईतील नेते आणि आमदार राम कदम हे भाजपचे धडाडीचे नेते आहेत
मुंबई - राज्यात सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, सर्वत्र भोंग्यारुन राजकारण सुरू आहे. त्यातच, औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंग्यांचा अल्टीमेटम दिला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य करत इफ्तार पार्ट्यांवरुन त्यांना टार्गेट. राज ठाकरेंच्या मुद्द्याचं अनेक भाजप नेत्यांनी समर्थन केलं आहे. मात्र, या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या वातावरणात भाजप नेते राम कदम यांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या आहेत.
भाजपचे मुंबईतील नेते आणि आमदार राम कदम हे भाजपचे धडाडीचे नेते आहेत. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेत माध्यमांचे लक्ष वेधले होते. कंगना राणौत आणि शिवसेना वादात त्यांनी कंगनाच्या बाजुने भूमिका घेत आंदोलनही केलं होतं. तर, काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणीही कदम यांनी जोर लावून धरली होती. आता, राम कदम यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी एका फोटोच्या माध्यमातून जागवल्या आहेत. कदम यांनी आई-वडिल आणि भावासमवेतचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, आई-वडिलांच्या मांडीवर राम कदम आणि त्यांचा भाऊ बसल्याचे दिसून येते.
My childhood pics .. wearing cap … My father and mother along with my elder brother .. pic.twitter.com/w2FTgqZMES
— Ram Kadam (@ramkadam) May 2, 2022
'डोक्यावर टोपी घातलेला मी... माझ्या आई-वडिल आणि मोठ्या भावासमेवत, लहानपणीचा फोटो...' असे कॅप्शन राम कदम यांनी या फोटोला दिले आहे. घाटकोपर पश्चिम हा मुंबई उपनगरातील विधानसभा मतदारसंघ आहे. मराठी बहुल मतदार असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजप नेते राम कदम करत आहेत. मनसेतून भाजपात येऊन रुळलेले राम कदम येथील विद्यमान आमदार आहेत. विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांना 2009 च्या निवडणुकीत राम कदम यांनी हरवले होते.
राम कदम हे भाजपच्या काही श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना तिरुपती बालाजी दर्शन आणि देवदर्शन घडवून आणण्यामुळे, दहीहंडी उत्सावातील सेलिब्रिटींमुळे ते चर्चेत असतात. तर, आपल्या 13 वर्षाच्या मुलाच्या वाढदिवशी त्यांनी मर्सिडीज कार भेट दिली होती, त्यामुळेही ते चांगलेच चर्चेत आले होते. राम कदम यांच्याकडे चारचाकी लक्झरी गाड्यांचाही ताफा आहे. त्यात, 80 लाख रुपयांची हमर, 55 लाखांची लेक्सस, 3 कोटी रुपयांची बेंटली, 5 कोटींची रॉल्सरॉयस गोस्ट आणि 1.5 करोड रुपयांची जॅग्वार सहभागी आहे. त्यात, कदम यांची सर्वात फेवरेट कार जॅग्वार आहे.