ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय? CM शिंदेंची नजर अशोक चव्हाणांकडे गेली अन् म्हणाले...सांगू का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:28 PM2023-01-24T13:28:27+5:302023-01-24T13:29:38+5:30
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आता तुम्ही कुणाला मिस करताय असं विचारलं असता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही.
मुंबई-
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आता तुम्ही कुणाला मिस करताय असं विचारलं असता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. पण त्यांनी यावेळी अशोक चव्हाण यांच्याकडे पाहून स्मितहास्य करत सांगू का? असं म्हटलं आणि एकच हशा पिकला. यानंतर शिंदेंनी सगळंच काही सांगायचं नसतं असं म्हणत वेळ मारुन नेली. 'एबीपी माझा' वाहिनीनं आयोजित केलेल्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाकरे सरकारनं मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडेंना दिलेलं, फडणवीसांचा गौप्यस्फोट!
एकनाथ शिंदे बोलत असतानाच कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं आगमन झालं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपलं बोलणं थांबवत आवर्जुन अशोक चव्हाण यांचा उल्लेख करत त्यांचं स्वागत केलं. "अशोक चव्हाण इकडे आले आहेत. ते चांगले आहेत. त्यांनीही मुख्यमंत्रिपद भोगलं आहे. वैयक्तिक मी काही इकडे बोलत नाही. पण गेल्या अडीच वर्षात कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे हे त्यांनीही पाहिलं आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.
उद्धव ठाकरे आता सोबत नसले तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्या नेत्यांना आता तुम्ही मिस करताय असं विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी कुणाचंही नाव घेणं टाळलं. "आता इथं नाव घेऊ का?", असं एकनाथ शिंदे म्हणाले आणि अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं. "सगळं काही सांगायचं नसतं. उगाच कुणाचं नाव घ्यायचो आणि त्यांना तिथं अडचण व्हायची", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
टीकेला कामानं उत्तर द्यावं
राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांकडून सध्या होणारी आक्षेपार्ह विधान आणि टीकांबाबतही मुख्यमंत्र्यांनी आपली भावना व्यक्त केली. "प्रत्येक नेत्यानं आपण लोकप्रतिनिधी आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपण काय बोलतो याचा परिणाम युवा पीढीवर होत असतो. प्रत्येकानं याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. मी तर प्रत्येकाला तेच सांगतो की टीकेला कामानं उत्तर द्या. आरोपांना कामानं उत्तर दिलं की बाकी काही बोलावं लागत नाही. लोकांची कामं करुन त्यांच्यामध्ये लोकप्रिय व्हा असं मी सहकाऱ्यांना सांगतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले.