मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच टार्गेट केलं, दोन लाखांपर्यंत कर्जाचे वन टाइम सेटलमेंट करू, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देऊ अशी घोषणा करणारे आणि विधानसभेत टाळ्या मिळवणारे अर्थमंत्री अजित पवार यांचा गजनी झाला आहे का? असा सवाल अनिल बोंडे यांनी विचारला आहे.
तुम्हाला गजनी चित्रपट आठवतो का? गजनी सर्व काही विसरायचा... असे म्हणत अजित पवार यांनी गजनी चित्रपटातील आमीर खानशी तुलना केली आहे. राज्यातील ठाकरे सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलविल्यामुळे शेतकऱ्यांचे 4 हजार 234 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला. तसेच, राज्याच्या कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही बोंडे यांनी केली आहे.
2019 च्या खरीप हंगामामध्ये 1 कोटी 28 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. तेव्हा तब्बल 85 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 5 हजार 795 कोटी रुपये मिळाले होते. दुसऱ्या बाजूला 2020 च्या खरीप हंगामात 1 कोटी 38 लाख शेतकऱ्यांनी पिक विमाा काढूनही फक्त 15 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी फक्त 974 कोटी रुपये मिळाले आहे. त्यामुळे खाजगी विमा कंपन्यांच्या घशात राज्याच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे 4 हजार 234 कोटी रुपये ठाकरे सरकारच्या चुकीमुळे गेल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला. तसेच, हे दलालांचे सरकार असून त्यांनी विमा कंपन्यांसाठी दलाली केल्याचा आरोपही अनिल बोंडे यांनी केला.