कोलकात्याची घटना लक्षात आहे ना? तशी अवस्था करू; महिला डॉक्टरला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 01:01 PM2024-08-25T13:01:21+5:302024-08-25T13:02:24+5:30
मानखुर्दमधील धक्कादायक प्रकार, चौघांविरोधात गुन्हा दाखल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोलकात्यातली घटनेच्या कटू आठवणी ताज्या असतानाच मानखुर्दमध्ये एका महिला डॉक्टरला तिच्या दवाखान्यातून फरफटत बाहेर आणत 'कोलकात्याची घटना लक्षात आहे ना? तशी अवस्था करू', अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी काजल रामास्वामी, अरुणा इंगळे आणि अनोळखी महिलेसह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चेंबूर परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिला डॉक्टरचा मानखुर्द येथे दवाखाना आहे. शुक्रवारी सायंकाळी एका अनोळखी मुलाने या महिला डॉक्टरच्या दवाखान्यासमोर त्याची बाइक पार्क केली. डॉक्टरने त्याला गाडी थोडी बाजूला करण्यास सांगितले. त्यानुसार मुलाने गाडी बाजूला पार्क केली आणि तो निघून गेला. शनिवारी पुन्हा तोच प्रकार घडला. महिला डॉक्टरने बाइक विजेच्या खांबाला टेकून उभी केली. काही वेळाने मुलगा तिथे आला. त्याने गाडी का पाडली, अशी विचारणा करत महिला डॉक्टरला शिवीगाळ केली. डॉक्टरने त्याला कानशिलात लगावली असता तो बाइक घेऊन घटनास्थळावरून निघून गेला.
महिलांचाही सहभाग
- संबंधित मुलगा काही वेळाने तीन महिलांना घेऊन दवाखान्यात आला. त्या सगळ्ळ्यांनी डॉक्टर महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली. एका महिलेने डॉक्टरला छत्री मारून फेकली. त्यानंतर तिन्ही महिला व त्या मुलाने डॉक्टरला मारहाण करत फरफटत दवाखान्याबाहेर आणले.
- मुलाने दवाखाना जाळून टाकेल तसेच कोलकात्यातील घटनेसारखी तुझी अवस्था करेल, अशी धमकी दिली. मारहाणीत डॉक्टर जखमी झाली. घटनेची वर्दी लागताच मानखुर्द पोलिस तिथे दाखल झाले.