अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता का?; ST चा पोलिसांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 09:12 AM2023-11-24T09:12:25+5:302023-11-24T09:13:15+5:30
एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी घातले पोलिसांना गाऱ्हाणे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना होऊन मोटार वाहन कायदा १९५० नुसार टप्पा प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी एसटी महामंडळाकडे देण्यात आली; परंतु खासगी वाहने आणि एजंट बसस्थानक परिसरातून अवैधपणे प्रवासी घेऊन जातात. त्यांच्यावर कारवाईसाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांना पत्राद्वारे कारवाईची विनंती केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने, एजंट रडारवर येणार आहेत.
बऱ्याच वेळा आगारप्रमुखांकडून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या जातात; पण कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
टप्पा प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी एसटी महामंडळाकडे.
मात्र खासगी वाहतूकदार विविध परवान्यांद्वारे बस,
जीप व अन्य छोट्या वाहनांचा वापर करतात.
ही वाहने सर्रासपणे अवैधरीत्या टप्पा प्रवासी वाहतूक करतात.
तीन, सहा आसनी रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरतात.
खासगी वाहतूकदार व अवैध प्रवासी वाहतूकदार २०० मीटर नो-पार्किंग झोनचे उल्लंघन करून एसटी बसस्थानकांच्या बाजूला आपली वाहने उभी करतात.
माणसं मरतात, आता तरी लक्ष द्या
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खासगी बसच्या संख्येत वाढ झाल्यामुळे खासगी बस वाहतूकदार हे मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य माल वाहतूकही करीत आहेत. त्यामुळे अवैध खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने व एजंट यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन चन्ने यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केले आहे.