"तेव्हा इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता का?", ठाकरेंचा टोकदार सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 10:24 AM2023-08-07T10:24:40+5:302023-08-07T10:45:22+5:30
उद्धव ठाकरे म्हणाले, इंडियाची बैठक होत आहे, त्यावरुनही मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली.
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर घणाघात केला. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना ठाकरेंनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच, राज्यात आणि देशात सुरू असलेल्या राजकीय फोडाफोडीवरही भाष्य केले. यावेळी, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मस्टरमंत्री असा केला. तसेच, इंडिया आघाडीवर मोदींनी केलेल्या टीकेवरुन त्यांना सवालही केला. तुम्ही जेव्हा परदेशात जाता, तेव्हा प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून जाता की, इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता? असा टोकदार सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, इंडियाची बैठक होत आहे, त्यावरुनही मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली. माणसं किती आत्ममग्न असू शकतात पाहा, इंडिया म्हणजे इंडियन मुजाहिद्दीन की काय? असं ते म्हणाले. व्वा, लगेच तुम्ही इंडियाला, माझ्या भारतमातेला इडिया, हिंदुस्तान, भारत ही आमच्या देशाची नावे आहेत. मग, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही परदेशात जातात. बायडेनला मिठ्या मारतात, ह्यांना मिठी मारता, त्यांना हस्तांदोलन करता, बाजुला उभे राहता तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. कारण, आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. मात्र, तेव्हा तुमची जी ओळख करुन दिली जाते, ती प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया... मग प्रश्न हा आहे की, तेव्हा तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की, इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता? असा टोकदार सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
काय म्हणाले होते मोदी
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुजिव्ह अलायन्स’ (इंडिया) या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढवला होता. मोदींनी विरोधी पक्षाच्या आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीसोबत केली. फक्त इंडिया नाव लावलं म्हणून सर्वकाही होत नाही, असं मोदी म्हणाले. ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा इंडिया नाव लावलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नावातही इंडिया आहे अशी बोचरी टीका मोदी यांनी केली.