लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडत थेट मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेल्या एकनाथ शिंदे यांना आधी आमदारांनी नंतर खासदारांनी पाठिंबा दिला. त्यात दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांचा अग्रक्रमांक लागतो. मात्र, आता आपल्या या निर्णयाचा आगामी लोकसभा निवडणुकीत फटका तर बसणार नाही ना, या काळजीने खासदार शेवाळे यांनी मतदारसंघातील जनमत जाणून घेण्यासाठी फोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही महायुतीत सहभागी झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोणता मतदारसंघ कुणाला मिळणार, कुणाला तिकीट मिळणार, अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघात आपला खुंटा बळकट करण्यासाठी राजकीय नेते चाचपणी करत आहेत. त्याचाच भाग म्हणून शेवाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावल्याचे दिसते.
दरम्यान, शिंदे यांच्यासोबत जाताना आम्हाला विचारले नाही, गृहीत धरले. मग आता निर्णय घेतल्यानंतर आम्हाला का विचारत आहात, अशी चर्चा सध्या त्यांच्या मतदारसंघात ऐकू येत आहे. दिवसाकाठी किमान १०० हून अधिक नागरिकांना फोन केला जात असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवाळे सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
खासदार राहुल शेवाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मतदारसंघातील नागरिकांना फोन केला जातो. मतदारांसाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. त्यात पुढील प्रश्नांचा समावेश आहे.
- राहुल शेवाळे यांची खासदार म्हणून कामगिरी कशी वाटते? - शेवाळे यांनी मतदारसंघात केलेल्या कामाचे तुम्हाला समाधान आहे का?- शेवाळे यांना पुन्हा खासदार म्हणून तुम्ही पसंती द्याल का?- शेवाळे यांचा शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का?