‘तक्रारी येतील तेवढेच खड्डे बुजवणार का?’
By admin | Published: June 11, 2017 03:36 AM2017-06-11T03:36:32+5:302017-06-11T03:36:32+5:30
अंधेरीतील मरोळमधल्या चर्च रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी के -पूर्व विभागाच्या अभियंत्याच्या व्हॉट्सअॅप नंबरवर
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरीतील मरोळमधल्या चर्च रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी के -पूर्व विभागाच्या अभियंत्याच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवला. त्यानंतर २४ तासांच्या आत पालिकेने तो खड्डा बुजवला. परंतु याच रस्त्यावरील, विभागातील, परिसरातील आणि
के -पूर्व विभागाच्या कार्यालयाबाहेरील रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत.
त्यामुळे ज्या खड्ड्यांबाबत तक्रारी येणार फक्त तेच खड्डे बुजवणार का, असा सवाल वॉचडॉगने महापालिकेला केला आहे.
नागरिकांना त्यांच्या परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचविता यावी यासाठी महापालिकेने सर्व विभागांत अभियंते नेमत त्यांचे व्हॉट्सअॅप
नंबर वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले.
त्यानंतर पिमेंटा यांनी पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाला प्रतिसाद देत
२४ तासांच्या आत सदर खड्डा बुजवण्यात आला. परंतु त्याच विभागातील इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी ‘लोकमत’ प्रतिनिधीनेही के-पूर्वच्या सदर क्रमांकावर फोन करत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विभागाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
अभियंते अनभिज्ञ
विशेष बाब म्हणजे पालिकेने नेमलेले अभियंते हे मुंबईतील रस्त्यांबाबत अनभिज्ञ आहेत, असे वॉचडॉगने म्हटले आहे. पिमेंटा यांनी खड्ड्यासंबंधीची माहिती पालिकेच्या के -पूर्व विभागाच्या अभियंत्याच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवली. त्यासोबत खड्ड्याचा फोटो, रस्त्याचे नावही पाठवले, त्यासोबत जवळचा लँडमार्कही सांगितला.
तरीही अभियंत्याने रस्त्याचे नाव सांगा? रस्त्याचे नाव सांगितल्यानंतर लोकेशन सांगा, असा प्रश्न अभियंत्याने विचारला. यावरून अभियंता विभागाशी, विभागामधील रस्त्यांबाबत अनभिज्ञ आहेत, असे वॉचडॉगचे म्हणणे आहे.