Join us

हुंडा मुलांना घ्यायचा-द्यायचा असतो की आई-वडिलांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हुंडा घेणे आणि देणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी हुंड्यासाठी अजूनही विवाहितांचे जीवन पणाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हुंडा घेणे आणि देणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी हुंड्यासाठी अजूनही विवाहितांचे जीवन पणाला लागले आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यामुळे पैसे, दागदागिने या कारणांवरून नवविवाहितेला होणारे जाच कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ६० वर्षांनंतरही चित्र कायम आहे. हुंडा नक्की कोणाला हवा, मुलांना की त्यांच्या आई-वडिलांना हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबईतील काही नागरिकांशी प्रातिनिधिक स्वरूपाची चर्चा केली असता, हल्ली हुंडा देण्या-घेण्याचे स्वरूप बदलल्याचे दिसून आले. रोख रकमेऐवजी सोने अथवा घर, दुचाकी-चारचाकी यांची मागणी केली जाते. मुलीच्या सुखी संसारासाठी, सासरच्या मंडळींच्या त्रासापासून वाचविण्यासाठी पालकही स्वखुशीने हुंडा देण्यास राजी होतात, असेही चर्चेतून समोर आले.

.....

हुंडाविरोधी कायदा काय?

- हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ या अधिनियमातील कलम २ अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या, विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षाला किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहापूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यावयाचे कबूल केलेली कोणतीही संपती अथवा मुल्यवान रोख.

- हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१च्या कलम ३ अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी ५ वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी १५ हजार रुपये अथवा अशा हुंड्याच्या मुल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल तितक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

.......

जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी

२०१९ - ६०३

२०२० - ४५४

२०२१ (ऑगस्ट) - ४७९

.....

मुलांच्या मनात काय?

मी हुंड्याच्या विरोधात आहे. जुन्या लोकांनी केलेल्या चुका आमच्या पिढीने सुधारायला हव्यात. तरच या कुप्रथेचे मुळासकट उच्चाटन होऊ शकेल. मुलांच्या पालकांनी आपल्या मुलीच्या जागी सुनेला ठेवून विचार करावा. तिचा असा छळ झालेला तुम्हाला सहन होईल का?

- परेश जाधव, विक्रोळी

--

हुंडा घेऊन मुलगी आणणे म्हणजे पैसे देऊन एखादी वस्तू खरेदी करण्यासारखे आहे. मुलगी ही वस्तू नाही. ती स्वत:चे घर, आई-वडील सोडून सासरी येते, आयुष्यभर नांदते आपल्याच सुनेकडून हुंडा घेणे हा अतिशय चुकीचा प्रकार आहे.

- संदीप घाटगे, अंधेरी

--

मुलांच्या पालकांना काय वाटते?

मुलाच्या शिक्षणावर पैसा खर्च केला म्हणून मुलीकडून हुंडा घेणे चुकीचे आहे. तसा खर्च मुलीच्या पालकांनाही येतोच की. हुंडा घेणारादेखील अनेकदा मुलीचा बाप असतोच. लग्न हा दोन कुटुंबांना जोडणारा विधी आहे, असा विचार समाजात रुजला पाहिजे.

- नकुल दळवी, विलेपार्ले

---

नवी सून शिकलेली, सुसंस्कृत असावी आणि कुटुंबाला एकसंध बांधून ठेवणारी असावी, हाच आजच्या काळातला खरा हुंडा आहे. हुंडा मागणारेही एका महिलेच्या उदरातून जन्माला आले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेचा आदर करायला शिका.

- अरुण बिर्जे, अंधेरी

--

मुलींच्या मनात काय

हुंड्याचा फेरा मुलींच्या मागून सुटलेला नाही. हल्ली त्याचे स्वरूप काहीसे बदलले आहे. कुणाला गाडी, फ्लॅट, दागिने हवे असतात. हे प्रमाण सुशिक्षित कुटुंबांमध्ये जास्त आहे. गरज असो वा नसो या गोष्टी स्टेटस सिम्बॉल म्हणून बघितल्या जातात. ही मानसिकता बदलली पाहिजे.

- मनाली वाघमारे, अंधेरी

.....

हुंडा मागणाऱ्यांचे तोंड बंद करायला जावे तर मुलीला संस्कार नाहीत, अशी दूषणे लावली जातात. आमच्या पालकांनी खूप काबाडकष्ट करून आम्हाला लहानाचे मोठे केले आहे. उतारवयात त्यांना आधार देण्याऐवजी हुंड्याच्या रूपाने कर्जाचा भार माथी मारावा लागण्यासारखे दुसरे दुःख नाही.

- शामल गायकवाड, घाटकोपर