कळंबोली : खांदा वसाहतीतील साडेपाच वर्षांची जान्हवी अचानक गायब झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र काहीच धागे सापडत नव्हते आणि पालकांकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे केवळ पोलिसांचाच नाही तर समस्त खांदा वसाहतीतील रहिवाशांचा जीव टांगणी लागला होता. मात्र रविवारी सकाळी सहा वाजता जान्हवीचे पालक तिला घेवून पोलीस ठाण्यात हजर झाले. दरम्यान, तिच्या आईनेच बनाव केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खांदा वसाहतीतील सेक्टर ११ येथील प्रबोधन सोसायटीत राहणारे शेखर आणि साक्षी उचाटे यांची साडेपाच वर्षांची जान्हवी खेळता खेळता बेपत्ता झाल्याची तक्रार २१ डिसेंबर रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यात देण्यात आली. इतकी लहानगी मुलगी अचानक गायब झाल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. तीन दिवस जान्हवी सापडत नसल्याने चिंता अधिकच वाढली. सोशल मीडियात या मुलीचे फोटो टाकण्यात आले. ही लहानगी कोणाला आढळली त्यांनी पोलिसांबरोबर संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले. पोलीस यंत्रणेने सुध्दा पथक तयार करून लागलीच शोधकार्य सुरू केले. मात्र काहीच माहिती समोर येत नव्हती. याशिवाय तिच्या आईकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे पोलिसांचाही आईवर संशय बळवला. त्यात ती सुध्दा एक दिवस बेपत्ता झाल्याची तक्रार आली. त्यामुळे तपास यंत्रणांनी आई साक्षी वापरत असलेल्या मोबाइलचा सीडीआर तपासला असता तिचे आपल्या बहिणीबरोबर म्हणजेच जान्हवीच्या मावशीबरोबर बऱ्याचदा बोलणे झाल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, तपास सुरू असतानाच उचाटे दाम्पत्य खांदेश्वर पोलीस ठाण्यात आले आणि पनवेल बसस्थानकावर जान्हवी सापडली असल्याचे सांगितले. पोलीस सुध्दा चक्र ावून गेले इतके दिवस ही लहानगी सार्वजनिक ठिकाणी राहू कशी शकते असा प्रश्न त्यांना पडला. मात्र काही असो ही मुलगी सापडली हे महत्त्वाचे असे मानून पोलिसांनी स्टेशन डायरीला नोंद करून त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. जान्हवी नेमकी कुठे सापडली, खरेच अपहरण झाले होते का, याचा पोलीस अधिकारी अमोल मोरे तपास करीत आहेत. (वार्ताहर) आम्ही तपास वेगाने केला, परंतु पालकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. उत्तर आणि माहिती मिळत नव्हती. या मुलीचे अपहरण झालेले नव्हते, तिला आपल्याकडे मावशीकडे ठेवण्यात आल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे.पुढील तपासात सत्य नेमके काय होते हे स्पष्ट होईल.- जयराम छापरीया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांदेश्वर पोलीस ठाणे
जान्हवी हरविल्याचा बनाव?
By admin | Published: December 26, 2016 6:26 AM