गोदी कामगारांना लोकल प्रवासाची परवानगी हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 06:44 PM2020-06-16T18:44:37+5:302020-06-16T18:45:17+5:30
अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार देखील अत्यावश्यक सेवेत काम करतात, गोदी कामगार 23 मार्चपासून अविरतपणे काम करीत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी,
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार देखील अत्यावश्यक सेवेत काम करतात, गोदी कामगार 23 मार्चपासून अविरतपणे काम करीत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त शकेरशी पारेख यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांच्याकडे केली आहे.
लॉक डाउन कालावधीमध्ये कामगार व अधिकाऱ्यांनी 9 लाख टन मालाची चढ उतार केली, त्यामध्ये लोखंड, सिमेंट, साखर, कडधान्य, तेल, मोटार वाहने, मोठ्या उद्योगांना लागणारी साधनसामुग्री इत्यादी मालाची चढ उतार केली. या कालावधीत जवळजवळ 98 जहाजे व 75 बार्जेस हाताळली गेली. गोदी कामगार व अधिकारी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेत पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत आहेत.
एक महिन्यापूर्वी अपराज व पारेख यांनी भाटीया यांच्याकडे लोकल रेल्वेने प्रवास करण्याची मागणी केली होती. पोर्ट ट्रस्ट कामगारांसाठी ओळखपत्र देऊन लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन भाटिया यांनी दिले होते. आता 15 जून पासून अत्यावश्यक कामगारांसाठी रेल्वे सेवा चालू झाल्यामुळे युनियनच्या या मागणीचा फेरविचार करून भाटिया यांनी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना पत्र पाठवून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मागावी अशी मागणी संघटनेने केली आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली.