डॉक्टरांना मारहाण; १३ जणांना एक वर्षाचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 06:52 AM2018-12-21T06:52:31+5:302018-12-21T06:53:00+5:30
रुग्णाच्या मृत्यूनंतर उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाºया १३ जणांना नुकतीच डहाणू न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
तलासरी : रुग्णाच्या मृत्यूनंतर उधवा प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाºया १३ जणांना नुकतीच डहाणू न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या १३ जणांनी गटविकास अधिकाºयाच्या वाहनाचे नुकसान केले होते. त्यामुळे या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर डहाणू न्यायालयाने आरोपींना १ वर्ष तुरुंगवासाची व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अशा प्रकारची शिक्षा ठोठावली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे डॉक्टरांवर आणि रुग्णालयांवर हल्ले करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी होऊन त्याचा निकालही तत्परतेने लागला आहे.
१४ नोव्हेंबर २०१४ रोजी उधवा म्हसेपाडा येथील मंगल कुरकुटे (७०) यांच्या छातीत दुखत असल्याने या केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या ३० जणांच्या जमावाने केंद्राची नासधूस केली व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांना मारहाण केली. या वेळी घटनास्थळी बचावासाठी गेलेल्या तलासरीच्या गटविकास अधिकाºयांच्या गाडीचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तलासरी पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायालयाने या प्रकरणातील संजय भोये, संदीप काळे, देवराम लाहंगे, सुनील उर्फ कमलेश शिंदा, दीपक प्रजापती, अब्दुल पठाण, भावेश दवणेकर, अनिल गवळी, राजू साठे, सुरेश घुटे, अनिल घुटे, अनिल चौधरी, विनायक पवार या तेरा जणांना एक वर्ष कैद व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.