डॉक्टर भक्ती मेहरेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:05 AM2019-05-29T06:05:05+5:302019-05-29T06:05:11+5:30
नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगची बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. भक्ती मेहरे हिला मंगळवारी सायंकाळी अटक केली.
मुंबई : नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगची बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. भक्ती मेहरे हिला मंगळवारी सायंकाळी अटक केली. तिच्यावर अपमानास्पद तसेच जातीवाचक टीकाटिप्पणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलीस डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल या दोघींचाही शोध घेत आहेत.
तडवी हिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या मेहरेसह अन्य दोघींनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यापूर्वीच आग्रीपाडा पोलिसांनी पहिली अटक केली. बुधवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तिघीही पसार झाल्या. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना निलंबित केले होते.
मंगळवारी दुपारी डॉ. भक्ती मेहरेला आग्रीपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळपर्यंत तिच्याकडे चौकशी करत तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त दीपक कुंडल हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
याचबरोबरीने एसीपींच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्यांच्याकडून नायरमधील डॉक्टर, विद्यार्थी, शिकाऊ डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी यांना एसीपी कार्यालयात बोलावून त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. तसेच तडवीसारखे आणखी कोणी वरिष्ठांकडून रॅगिंगच्या शिकार ठरत आहेत का? या बाजूनेही पोलीस चौकशी करीत आहेत.
या प्रकरणात युनिट हेड डॉ. चिंग लिंग यी, स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. एस. डी. शिरोडकर यांच्याकडेही उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. वॉर्डनकडेही तडवीसोबत घडलेल्या गैरवर्तनाबाबत विचारणा करण्यात येत आहे. त्यानुसार, या प्रकरणात अन्य दोघींनाही लवकरच अटक होणार असल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली.