डॉक्टर... माझ्या आजाराबद्दल कोणाला सांगू नका!, मानसोपचारतज्ज्ञांना रुग्णांचे फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 07:19 AM2020-07-15T07:19:40+5:302020-07-15T07:23:20+5:30
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) हा मानसिक विकाराने ग्रस्त होता की नाही याबाबत अधिकृतरीत्या दुजोरा देण्यात आलेला नाही. ...
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) हा मानसिक विकाराने ग्रस्त होता की नाही याबाबत अधिकृतरीत्या दुजोरा देण्यात आलेला नाही. अन्य मानसोपचारतज्ज्ञांना मात्र रुग्णांकडून फोन करून ‘डॉक्टर, माझ्या आजाराबद्दल कोणाला काही सांगू नका,’ अशी विनंती केली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
एका नामांकित मानसोपचारतज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, ‘माझ्याकडून उपचार घेणाऱ्या एका व्यक्तीने मला फोन केला आणि त्याच्या बºयाच खासगी गोष्टी माझ्याकडे सांगितल्या. यामुळे तो तणावात असल्याचे त्याचे म्हणणे होते.
मात्र सुशांतच्या प्रकरणाचे उदाहरण देत याबाबत कुठेही वाच्यता करू नका, असे तो वारंवार मला सांगत होता. त्याला याची शाश्वती कशी द्यायची हेच मला कळत नव्हते असे डॉक्टरचे म्हणणे होते.
तर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असलेल्या आणि त्यासाठी डॉक्टरकडून उपचार घेणाºया महिलेनेही अशीच विनंती करत पतीला याबाबत काही कळू देऊ नका, असे डॉक्टरला सांगितले. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने गर्भपात केलेल्या तरुणीलाही अशाच भीतीने ग्रासले होते.
त्यामुळे जी प्रकरणे डॉक्टर हाताळत आहेत आणि जीवन-मरणाचा प्रश्न असल्याइतके ते संवेदनशील आहेत त्याची वाच्यता बाहेर होणे हे त्या रुग्णासाठीसुद्धा घातक आहे. त्यानुसार सुशांतची मानसिक स्थिती उघड झाल्याची भीती रुग्णांमध्ये बसली असून त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासार्हताच धोक्यात आल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सुशांतचा धसका
- सुशांत हा मानसिक रुग्ण होता, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तथ्य अजूनही गुलदस्त्यात असले तरी या प्रकरणामुळे काही मानसोपचारतज्ज्ञांना रुग्णाकडून त्यांच्या खासगी गोष्टी उघड न करण्याची विनंती केली जाते.