"दुप्पट डॉक्टर तयार होऊनही अनेक राज्यांत डॉक्टरांचा दुष्काळ"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 07:13 AM2024-06-16T07:13:54+5:302024-06-16T07:14:16+5:30
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर यांचे प्रतिपादन.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात भारताने विकसित राष्ट्रांची बरोबरी करावी, असे आपले ध्येय आहे. अशावेळी आपल्याकडील शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रे मजबूत असायला हवीत. शहरी तसेच ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी देशातील डॉक्टरांची संख्या वाढणे अत्यंतिक गरजेचे असून गेल्या दहा वर्षांत डॉक्टरांची संख्या दुप्पट झाली. परंतु अजूनही अनेक राज्यांत ही संख्या अपुरीच असल्याचे मत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर यांनी शनिवारी व्यक्त केले.
जे. जे. रुग्णालयात मार्ड आणि आरोग्य विद्यापीठ यांच्यातर्फे तीनदिवसीय मार्डकॉन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत डॉ. गंगाधर बोलत होते. यावेळी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेश इन मेडिकल सायन्सचे कार्यकारी संचालक डॉ. मिनू बाजपेयी, आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर आणि जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे उपस्थित होत्या.
'आरोग्यक्षेत्रात भरीव संशोधनाची गरज'
डॉक्टरांनी मोठ्या संख्येने आरोग्य क्षेत्रात भरीव संशोधन करण्याची गरज आहे. या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. तसेच मोठ्या संख्येने सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांत अध्यापकांची गरज आहे. देशांतील काही राज्यांत आजही डॉक्टरांची संख्या पुरेशा प्रमाणात नाही. तरीही देशात गेल्या दहा वर्षांत नवे डॉक्टर घडण्याची संख्या दुप्पट झाली आहे, असे डॉ. गंगाधर यांनी सांगितले.
वैद्यकीय सुविधांचा पाया विस्तारणे गरजेचे
- या परिषदेत डॉ. गंगाधर यांनी वैद्यकीय सुविधांबरोबरच डॉक्टरांची संख्या वाढणे गरजेचे का आहे, यावर विवेचन केले. ते म्हणाले की, अनेक परिषदांमध्ये मला याबाबत विचारले जाते. देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवली जात आहे, डॉक्टरांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
- हे सर्व गरजेचे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याचे उत्तर होय असे आहे. कारण आजही शहरी आणि ग्रामीण भारताची लोकसंख्या आणि डॉक्टर यांचे प्रमाण व्यस्त आहे. रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे. ही दरी भरून काढण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढविण्याबरोबरच वैद्यकीय सुविधांचा पाया विस्तारणेही गरेजेचे आहे.
- डॉ. कानिटकर म्हणाल्या की, डॉक्टरांना ज्या समस्या 3 भेडसावतात त्यांची सर्व उत्तरे या परिषदेमधून मिळणार आहेत. वैद्यकीय आयोगाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक निवासी डॉक्टरला अंतिम परीक्षा देण्यापूर्वी लाइफ सपोर्ट प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ऐन कार्यक्रमात बत्ती गुल
या परिषदेत डॉ. कानिटकर यांचे भाषण सुरू असताना अचानक रुग्णालयातील आणि आजूबाजूच्या परिसरातील वीज गेली. मात्र सभागृहातील अंधारात डॉ. कानिटकर यांनी आपले भाषण सुरु ठेवले. माईकशिवाय २० मिनिटांहून अधिक वेळ त्यांनी विद्यार्थ्यांना 'खणखणीत' आवाजात मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बाजपेयी यांनीसुद्धा अंधारातच भाषण दिले. त्यांचा सत्कार सोहळाही अंधारातच करावा लागला. काही विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या बॅटरीच्या प्रकाशाने सभागृहातील अंधार भेदण्याचा प्रयत्न केला.