बेबी पेंग्विनच्या दिमतीला डॉक्टर, कर्मचाऱ्यांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:48 AM2018-08-18T03:48:49+5:302018-08-18T03:49:39+5:30

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेत जन्माला आलेल्या नव्या पाहुण्याच्या काळजीसाठी कर्मचा-यांसह डॉक्टरांना ‘जागते रहो’चा नारा द्यावा लागत आहे.

Doctor & employees to eyes on Baby Penguin's health | बेबी पेंग्विनच्या दिमतीला डॉक्टर, कर्मचाऱ्यांची फौज

बेबी पेंग्विनच्या दिमतीला डॉक्टर, कर्मचाऱ्यांची फौज

googlenewsNext

- चेतन ननावरे
मुंबई  - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेत जन्माला आलेल्या नव्या पाहुण्याच्या काळजीसाठी कर्मचा-यांसह डॉक्टरांना ‘जागते रहो’चा नारा द्यावा लागत आहे. स्वातंत्र्य दिनी जन्मास आलेल्या बेबी पेंग्विनचे इतर पेंग्विनपासून संरक्षण होण्यासाठी प्रशासनाने पेंग्विन कक्षातील एका कोपºयात बॅरिकेड्स लावले आहेत. याशिवाय पुढील दोन ते अडीच महिने प्रशासनाला पेंग्विनच्या या पिल्लाच्या देखभालीसाठी खबरदारी घ्यावी लागणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
त्रिपाठी यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेºयाच्या मदतीने बेबी पेंग्विनवर लक्ष ठेवले जात आहे. तूर्तास तरी पिल्लाची काळजी घेण्याचे काम त्याचे आईवडील अर्थात फ्लिपर आणि मिस्टर मॉल्ट ही पेंग्विनची जोडी करत आहे. त्यातील फ्लिपर ही मादी मासे खाऊन त्याच्या पचनानंतर शरीरात निर्माण झालेला चोथा उलटीद्वारे बाहेर काढून पिल्लाला भरवण्याचे काम करत आहे. तसेच इतर पक्ष्यांपासून पिल्लाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही जोडी पार पाडत आहे. तरीही या जोडीची नजर चुकवत इतर पेंग्विनकडून पिल्लावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सीसीटीव्हीच्या मदतीने पिल्लावर लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन ते अडीच महिने पेंग्विनची जोडी पिल्लाला भरवण्याचे काम करतील. त्यानंतर पिल्लाला पिसे येतील. पिसे आल्यानंतरच इतर पेंग्विनप्रमाणे बेबी पेंग्विन पोहण्यासाठी सक्षम होईल. तेव्हाच त्याला पर्यटकांना पाहण्यासाठी खुले केले जाईल. या प्रक्रियेसाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत प्रशासन जातीने या पिल्लाकडे लक्ष देणार आहे.

...म्हणून प्रशासनाला
अधिक चिंता!

भारतात जन्मास आलेले हे पहिलेच पेंग्विनचे पिल्लू असून, त्याच्यावर उभ्या देशाचे लक्ष आहे. त्यामुळे त्याच्या देखभालीच्या जबाबदारीचे दडपण पालिका प्रशासनावर आहे.
याआधी झालेल्या पेंग्विनच्या मृत्यूमुळे मनपा प्रशासनासह येथील कर्मचारी जातीने बेबी पेंग्विनची काळजी घेत असल्याची माहिती एका कर्मचाºयाने दिली.

राणीबागेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड हातून निसटत असताना, मुंबई महापालिकेला एका प्रकरणात सुखद दिलासा मिळाला आहे. भायखळा येथील मोक्याचा भूखंड खासगी कंपनीच्या घशात जाणार होता. मात्र, या प्रकरणाचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे. मफतलाल कंपनीने विस्तारित राणीबागेच्या सात एकर भूखंडावर दावा केला होता, परंतु या कंपनीने दाखल केलेली याचिकाच उच्च न्यायालयाने रद्द ठरविली. त्यामुळे राणीबागेच्या विस्तारित प्राणिसंग्रहालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

राणीबागेलगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. हा भूखंड मे. मफतलाल इंडस्ट्रिज लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. राज्य शासनाने २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार भाडेपट्ट्याचा कालावधी २०१७ मध्ये संपल्यानंतर, मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांद्वारे या भूखंडाच्या निम्मा, म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूखंड महापालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, हा भूखंड ७ जानेवारी २०१७ रोजी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला.

या भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, या हस्तांतरणाविरोधात मे. मफतलाल इंडस्ट्रिज लिमिटेड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायधीश सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायाधीश भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत ही याचिका रद्द करण्यात आल्याची माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

Web Title: Doctor & employees to eyes on Baby Penguin's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.